polling station: मतदान केंद्रांची संख्या कमी होणार
polling station:

एका मतदान केंद्रासाठी मतदारांची संख्या तेराशे निश्चित
निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर मतदान केंद्रांची संख्या अंतिम होणार
polling station: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत (एसआयआर) जिल्ह्यातील २८ लाख मतदार वगळले जाणार आहेत. मतदारांची संख़्या कमी झाल्याने मतदान केंद्रांमध्येही घट होण्याची शक्यता आहे.
आता मतदान केंद्राचीसुध्दा पुर्नरचना केली जाणार आहे. आता एका मतदान केंद्रासाठी मतदारांची संख्या तेराशे निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली जाणार आहे.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची मुदत १७ ऑगस्ट रोजी संपली. या मोहिमेत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांचा आकडा २८ लाख ६९ हजार ७९५ असल्याचे स्पष्ट झाले. हे मतदार ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारुप मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीवेळी असलेली ९० लाख ८० हजार १७३ मतदार आता घटून ६२ लाख १० हजार ३७४ इतकी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात ८ हजार ५६२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी ग्रामीण भागात चौदाशे मतदारांमागे एक तर शहरी भागात बाराशे मतदारांमागे एक मतदान केंद्र असे नियोजन जिल्हा निवडणूक शाखेने केले होते. मात्र, विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेनंतर जिल्ह्यातील मतदारांची संख्या घटल्याने मतदान केंद्रांमध्येही घट होण्याची शक्यता आहे.
जिल्हा निवडणूक शाखेने यासंदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतदान केंद्रांच्या आराखड्याचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार असून त्यांच्या मान्यतेनंतर मतदान केंद्रांची संख्या अंतिम होणार आहे.
मतदान केंद्रांच्या जागा कायम
मतदारांच्या संख्येनुसार मतदान केंद्र निश्चित करण्याची प्रक्रियाही बदलण्यात आली असून आता सरसकट तेराशे मतदारांमागे एक मतदान केंद्र निश्चित करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास एक आठवड्याने मुदतवाढ दिली आहे.
मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणामध्ये आता तेराशे मतदारांची संख्या गृहीत धरून एका इमारतीतील मतदान केंद्रांची संख्येत घट होऊ शकते. मात्र, काही ठिकाणी त्यात वाढ होऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, मतदान केंद्रांची जागी बदलण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.





