PMC News: ‘पाऊस आला धावून, चुना गेला वाहून!’ महापालिकेचा अजब प्रताप; पुणेकरांचे लाखो रुपये पाण्यात
PMC News: मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क प्रभागात भरपावसात सुशोभीकरणाचे काम; काही मिनिटांतच लावलेला चुना रस्त्यावर वाहून गेल्याने नागरिकांचा तीव्र संताप.

PMC News – भरपावसात भिंतींना चुना लावून सुशोभीकरणाचे काम सुरू केल्याचा प्रकार बिबवेवाडी परिसरात उघडकीस आला असून, पावसात सुरू केलेले काम काही मिनिटांतच वाहून गेल्याने महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने या कामाला परवानगीच दिली नसल्याचे स्पष्ट केल्याने प्रशासनाच्या समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
विशेष म्हणजे स्थायी समिती अध्यक्षही या प्रभागातून निवडून आलेले आहेत. मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क प्रभागातील आदिनाथ सोसायटीच्या मागील बाजूस भिंतींना चुना लावण्याचे काम सुरू असतानाच पावसाने हजेरी लावली. परिणामी लावलेला चुना भिंतीवर टिकण्याऐवजी थेट रस्त्यावर वाहून गेला. भरपावसात असे काम करण्याचे नियोजन आणि कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
आश्चर्यकारक बाब म्हणजे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयालाच या कामाची माहिती नव्हती. सहाय्यक आयुक्त शीतल वडके यांनी प्रभाग क्रमांक २१ मध्ये भिंती रंगविण्यासाठी कोणतीही परवानगी किंवा निधी दिला नसल्याचे सांगितले. तरीही हे काम कोणाच्या आदेशाने सुरू झाले, याची चौकशी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे स्थानिक नगरसेविका मनीषा चोरबेले यांचे पती माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी प्रभागस्तरीय निधीतून भिंतीच्या सुशोभीकरणासाठी सुमारे २ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने हे काम सुरू केल्याचे सांगितले.
मात्र, काम सुरू असतानाच अचानक पाऊस आल्याने चुना वाहून गेल्याचा दावा केला. काही दिवसांपूर्वी भरपावसात झाडांना टँकरने पाणी घालण्याचा प्रकार चर्चेत असतानाच आता पावसातच भिंतींना चुना लावण्याचा प्रकार समोर आल्याने महापालिकेच्या कामांच्या नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“भरपावसात भिंतीला रंग देणे, ही सरळसरळ पुणेकरांच्या निधीची उधळपट्टी सुरू असून, संबधितांवर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे.”
– नाना भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना





