Khadakwasla: खडकवासलातून रब्बीचे आवर्तन बंद
Khadakwasla:

धरणसाखळीत २१.२२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक
Khadakwasla: खडकवासला धरणातून रब्बी हंगामातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन २० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता बंद करण्यात आले.
तब्बल ५६ दिवस सुरू राहिलेल्या या आवर्तनात ५.३४ टीएमसी पाण्याचा वापर झाला असून, सध्या धरणसाखळीत २१.२२ टीएमसी (७२.८१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
खडकवासला धरण प्रकल्पांतर्गत चालू वर्षात आतापर्यंत पाण्याची एकूण तीन आवर्तने पूर्ण झाली आहेत. यामध्ये सर्वप्रथम आषाढी पालखी सोहळ्यासाठी ७ ते १५ जुलै या नऊ दिवसांच्या कालावधीत विशेष आवर्तन सोडण्यात आले होते, ज्यामध्ये ०.४६ टीएमसी पाणी वापरले गेले. त्यानंतर लगेचच १६ जुलैपासून खरीप हंगामाचे आवर्तन सुरू करण्यात आले.२५ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच ६० दिवस चाललेल्या या खरीप आवर्तनात ६.४७ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
खरीप आवर्तनाला जोडूनच २६ सप्टेंबरपासून रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे संयुक्त आवर्तन सुरू करण्यात आले होते. या नियोजनानुसार २६ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत शेतीच्या सिंचनासाठी, तर १६ ते २० नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत केवळ पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्यात आले.
या संपूर्ण ५६ दिवसांच्या आवर्तनात ५.३४ टीएमसी पाणी खर्च झाले. आता हे आवर्तन थांबवण्यात आले असून, धरणसाखळीत ७२.८१ टक्के साठा शिल्लक असल्याने आगामी काळातील पाण्याचे नियोजन सुकर होणार आहे.





