Pune : पुण्यातील मिठाईच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; २७ हजारांची मिठाई जप्त!
Pune : तपासणीदरम्यान मिठाई तयार करण्यासाठी विनाप्रमाणित रंगाचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले.

Pune : सध्या राज्यात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरूच आहे. अशातच पुण्यातील शिवणे परिसरात मिठाई विक्री करणाऱ्या मिठाईच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे.
कामठे वस्ती येथील मे. कन्हैया स्वीट्स या दुकानाची तपासणी केली असता अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. तपासणीदरम्यान मिठाई तयार करण्यासाठी विनाप्रमाणित रंगाचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच दुकानातील अस्वच्छ वातावरण आणि झुरळांचा प्रादुर्भावही आढळला. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने संबंधित दुकानावर कारवाई केली.
या कारवाईत तब्बल २७ हजार २४० रुपये किमतीची मिठाई जप्त करण्यात आली. तसेच विक्रीसाठी ठेवलेली मिठाई आणि मोतीचूर बुंदी नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील मिठाई विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.





