congress : छात्रों की गूंजमुळे कॉंग्रेसमध्ये चैतन्य
congress :

congress : काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज कार्यक्रमामुळे शहर कॉंग्रेसला नवचैतन्यच प्राप्त झाले आहे. मात्र हे नवचैतन्य तात्पुरते की कायमस्वरुपी राहणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर असून संपूर्ण देशातून विद्यार्थी विविध महाविद्यालय व विद्यापीठात शिक्षण घ्यायला येतात. विद्यार्थ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी आंदोलन करतात.
नीट पेपरफूटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचा मुख्य केंद्रबिंदू पुण्यात होता. पुण्यात नीट पेपर फुटीविरुध्द कॉंग्रेसने तीव्र आंदोलनेही केली. त्याला उत्स्फुर्त प्रतिसादही मिळाला. त्यानंतर राहुल गांधी यांचा छात्रो की गूंज हा कार्यक्रम पुण्यात घेण्याबाबत शिक्कामोर्तबही झाले.
कॉंग्रेस भवन अनेकदा ओस पडल्याचे चित्र पहायला मिळायचे. नेते, पदाधिकारी, नगरसेवक फारसे कधी कॉंग्रेस भवनकडे फिरकत नसत. मोजकीच मंडळी कॉंग्रेसभवन मध्ये असायची. छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या निमित्ताने कॉंग्रेस भवन गेले काही दिवस गर्दीने गजबजल्याचे चित्र पहायला मिळाले.
बैठका, पत्रकार परिषदा, मेळावे, रॅली या माध्यमातून शहर कॉंग्रेसला उर्जाच प्राप्त झाली. त्यात सर्वांनी गटबाजी विसरुन कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी एकदिलाने काम करा, असा सल्लाही बड्या नेत्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सतत दिला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले.
छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कॉंग्रेसचे दिग्गज नेते, पदाधिकारी, नगरसेवक, संघटना, सेल व कार्यकर्त्यांनी एकजूटीने काम करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. कार्यक्रमापुर्वी चांगली वातावरण निर्मितीही करण्यात आली होती.
राहुल गांधी यांनी युवतींशी संवाद साधत त्यांचे प्रश्न, समस्या, व्यथा जाणून घेतल्या. या कार्यक्रमाला युवतींबरोबरच युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमानंतर युवक-युवतींमध्ये जोरदार चेतना निर्माण झाल्याचे आढळून आले. शहर कॉंग्रेसने सद्या निर्माण झालेले नवचैतन्य कायमस्वरुपी टिकवून ठेवल्यास कॉंग्रेसला सुगीचे दिवस नक्कीच येतील, अशी चर्चा आहे.





