Ajitdada Pawar Memorial: बालेवाडीत स्व. अजितदादा पवार यांचे स्मारक उभारा; पूनम विधाते यांचे महापालिकेला निवेदन
Ajitdada Pawar Memorial: त्यांच्या कार्याची नोंद कायमस्वरूपी राहावी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने स्मारक उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

Ajitdada Pawar Memorial: बालेवाडी परिसरातील आरक्षित जागेवर स्व. अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या पूनम विधाते यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपूरे (Manjusha Nagpure) तसेच विरोधी पक्षनेते अॅड. निलेश निकम (Nilesh Nikam) यांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, बालेवाडी येथील जकात नाक्यासाठी पूर्वी आरक्षित असलेली जागा नंतर मेट्रो स्टेशनसाठी राखीव करण्यात आली. मात्र, त्या ठिकाणचा काही भाग अद्याप मोकळा असून सार्वजनिक उपयोगासाठी तो उपलब्ध आहे. या जागेचा उपयोग करून स्व. अजितदादा पवार यांचे स्मारक उभारण्याची संधी असल्याचे विधाते यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे शहर आणि महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा, जलसंधारण, सिंचन आणि विविध विकास प्रकल्पांना गती मिळाली. त्यांच्या कार्याची नोंद कायमस्वरूपी राहावी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने स्मारक उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
बालेवाडी परिसर हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (NH-4) लगत असल्यामुळे या ठिकाणी उभारण्यात येणारे स्मारक शहराचे आकर्षण ठरू शकते, असेही निवेदनात नमूद आहे.
उर्वरित जागेवर स्व. अजितदादा पवार यांचे भव्य व सुयोग्य स्मारक उभारण्यात यावे, ज्यायोगे त्यांच्या कार्याला अभिवादन करता येईल आणि पुणे शहराच्या वैभवात भर पडेल, अशी मागणी करण्यात आली आहे.




