Loni Kalbhor : वढू बंधाऱ्यात पाणी दाखल
Loni Kalbhor ; यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने भीमा नदीतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. नदीकाठच्या गावांमधील तसेच वाघोली पंचक्रोशीतील प्रादेशिक व स्थानिक पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला होता.

लोणी काळभोर : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील भीमा नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वढू बंधाऱ्यात पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे वाघोली गावाची पाणीपुरवठा योजना पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, वाघोली पंचक्रोशीतील सुमारे एक लाख नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने भीमा नदीतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. नदीकाठच्या गावांमधील तसेच वाघोली पंचक्रोशीतील प्रादेशिक व स्थानिक पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला होता. वाघोलीतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी आमदार माऊली आबा कटके यांनी सातत्याने लावून धरली होती. या पाठपुराव्यानंतर भामा आसखेड धरणातून २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. हे पाणी आता रात्रीच्या सुमारास वढू बंधाऱ्यात दाखल झाले आहे.
पाणी काटकसरीने वापरा; आमदार माऊली कटके यांचे आवाहन
या संदर्भात बोलताना आमदार माऊली कटके म्हणाले, शिरूर-हवेली मतदारसंघातील माझ्या मायबाप जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. भीमा नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केले. वढू बंधाऱ्यात पाणी दाखल झाल्याने वाघोलीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न पूर्ववत होण्यास मोठी मदत होणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन मी सर्व नागरिकांना करतो.





