Pune District : विड्याच्या पानांची २,१०० डागांची विक्रमी आवक
Pune District : कमी पावसाचा आणि दुष्काळी पट्टा असूनही येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पानमळा संस्कृती जतन केली आहे.

निमगाव केतकी : पुणे जिल्ह्याची पानांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निमगाव केतकी येथे नवरात्रोत्सवाच्या तोंडावर पानांच्या बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे. बाजारात एकाच दिवशी पानांच्या तब्बल २, १०० डागांची विक्रमी आवक झाली असून बाजाराला यात्रेचे स्वरूप आले होते.
निमगाव केतकी हा संपूर्ण महाराष्ट्रातील विड्याच्या पानांचा सर्वात मोठा बाजार मानला जातो. येथून मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर यांसह शेजारील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणावर पाने पाठवली जातात. नवरात्रोत्सवात पूजेसाठी पानांना प्रचंड मागणी असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे.
कमी पावसाचा आणि दुष्काळी पट्टा असूनही येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पानमळा संस्कृती जतन केली आहे. अत्यंत कमी पाण्यात आणि वर्षभर शाश्वत रोजगार देणारे पीक म्हणून पानमळ्याकडे पाहिले जाते. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी, भवानीनगर, गोतांडी, लाकडी या परिसरात सुमारे २, ००० एकर क्षेत्रावर पानमळे पसरलेले आहेत.
मिळणाऱ्या चांगल्या दरांमुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असले, तरी भविष्यात पानमळे टिकवण्यासाठी पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पानांचे प्रकार व बाजारभाव (प्रति डाग):
१. कळी पान: ३,५०० ते ५,००० रुपये (सर्वात जास्त मागणी असलेले आणि पूजेसाठी वापरले जाणारे टवटवीत काळे पान)
२. सरपट पान: १,५०० ते ३, ५०० रुपये (मध्यम प्रत, सर्वसाधारण वापरासाठी)
३. फापटा पान: ५,००० ते ६, ००० रुपये (सर्वात मोठे आणि आकर्षक पान; यंदा या प्रकाराला सर्वोच्च ६,००० रुपयांचा दर मिळत आहे)
नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज साधारण ५०० डाग पानांची आवक होते. मात्र सणाच्या तोंडावर एकाच दिवशी २,१०० डागांची आवक झाली आहे. हा गेल्या पाच वर्षांतील उच्चांक आहे. पाऊस कमी असूनही शेतकऱ्यांनी कष्टपूर्वक पानमळे जगवले आहेत.
-बापू खराडे, आडतदार, निमगाव केतकी.





