Khadakwasla : खडकवासला परिसरात उच्चदाबाच्या वीजतारा झाडाझुडपांत; नागरिकांच्या जीवाला धोका
Khadakwasla : खडकवासला धरण परिसरातील कुडजे, मांडवी, खडकवाडी, आगळंबे भागात उच्चदाबाच्या वीजतारा झाडाझुडपांत अडकल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून महावितरणकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.

Khadakwasla : खडकवासला धरण परिसरातील कुडजे, मांडवी, खडकवाडी, आगळंबे आदी भागांत उच्चदाबाच्या वीजवाहिन्या घनदाट झाडाझुडपांत अडकल्या आहेत. काही ठिकाणी वीजतारा जमिनीपासून अवघ्या चार ते पाच फुटांवर लोंबकळत असल्याने नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या भागातून दररोज हजारो पर्यटक आणि नागरिकांची वर्दळ असते. झाडाझुडपांमधून वीजप्रवाह शेतवस्त्यांपर्यंत पोहोचण्याचा धोका असल्याचा दावा हवेली तालुका शेतकरी कृती समितीने केला आहे. याबाबत महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप समितीने केला आहे.
मुख्य एनडीए-बहोली रस्त्यावर कुडजे, मांडवी परिसरातही वीजतारा धोकादायक स्थितीत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना न झाल्यास बेमुदत सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.
कृती समितीचे निमंत्रक गजानन पायगुडे यांच्यासह दिलीप पायगुडे, राजेंद्र ढमढेरे, तुकाराम चव्हाण, दीपक पायगुडे, हर्षल पायगुडे, अॅड. किसन मांजरे, सोपान पायगुडे आदी उपस्थित होते.





