Indrayani River : पवित्र इंद्रायणी प्रदूषणाच्या विळख्यात! रसायनयुक्त पाणी आणि कचऱ्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट
Indrayani River : मैलामिश्रित सांडपाणी आणि औद्योगिक रसायने थेट पात्रामध्ये; इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे भीषण ग्रहण, उग्र दुर्गंधीने नागरिक हैराण.

Indrayani River – संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र आळंदीतून वाहणार्या इंद्रायणी नदीला सध्या प्रदूषणाचे भीषण ग्रहण लागले आहे. नदीकाठच्या गावांतील मैलामिश्रित सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतींमधील रसायनयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने प्रदूषणाची पातळी धोकादायकरीत्या वाढली आहे.
आळंदीतील सिद्धबेट बंधार्याजवळ जलपर्णीचा वेगाने फैलाव होत असून, बंधार्यातून खाली येणारे पाणी हिरवट-पिवळसर दिसत आहे. नदीतील पाण्याचा साठा कमी झाल्याने साचलेला मैला व रसायनयुक्त गाळ यामुळे पाणी पूर्णपणे काळवंडले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरात उग्र दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. नदीची दुरवस्था केवळ सांडपाण्यामुळेच नव्हे, तर मानवी निष्काळजीपणामुळेही वाढत आहे.
नदीपात्रात प्लास्टिक पिशव्या, जुने कपडे, फोटो व इतर कचर्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. विविध सणांनंतर विसर्जित करण्यात आलेल्या देवतांच्या मूर्तीही उघड्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. लाखो वारकर्यांचे श्रद्धास्थान असलेल्या या पवित्र नदीला प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ‘गटार गंगे’चे स्वरूप प्राप्त झाल्याने भाविक व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जुना पूल व भगवान महावीर पुल येथे सुरक्षा जाळी बसवण्यात आली असली तरी त्यावरूनच काही नागरिक निर्माल्य व इतर वस्तू नदीत टाकत असल्याचे दिसून येते. नदीपात्रात कचरा टाकणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच घाट परिसरात मृत व्यक्तींचे जुने फोटो व पूजासाहित्य टाकले जात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
दरम्यान, आळंदी नगर परिषदेच्या वतीने दर महिन्याच्या एकादशीला स्वच्छता अभियान राबवले जाते. विविध सामाजिक संस्थांकडूनही घाट परिसरात स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, इंद्रायणी नदीचे पावित्र्य टिकवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याची गरज व्यक्त केली जात आहे.





