Indapur Water Scarcity : इंदापूर तालुक्यात सूर्य ओकतोय आग! पाण्याअभावी २२ गावांच्या शेतीपिकांच्या अंतिम घटका
Indapur Water Scarcity : इंदापूर तालुक्यात उष्णतेचा भीषण तडाखा; पारा ४३ अंशांवर पोहोचल्याने दुपारच्या वेळेत बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, जनजीवन विस्कळीत.

Indapur Water Scarcity – इंदापूर तालुक्यावर सध्या भीषण उष्णतेचे संकट घोंगावत असून, वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून, तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत रस्ते आणि बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
इंदापूर शहरासह निमगाव केतकी, भिगवण आणि परिसरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सकाळी ११ नंतर नागरिकांची वर्दळ लक्षणीयरीत्या घटत आहे. दुपारच्या कडक उन्हामुळे संध्याकाळी पाचपर्यंत अनेक ठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे. व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसत असून, ग्राहकांची संख्या कमी झाल्याने व्यवहार मंदावले आहेत. दुसरीकडे वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांचा कल शीतपेये, उसाचा रस, लिंबूपाणी आणि थंड पेयांकडे वाढताना दिसत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातही परिस्थिती गंभीर बनली आहे. भूजल पातळी झपाट्याने खालावत असल्याने विहिरी, बोअरवेल आणि शेततळ्यांची पाणीपातळी चिंताजनकरीत्या घटली आहे. परिणामी शेतातील उभी पिके करपू लागली असून, अनेक ठिकाणी पिकांनी अक्षरशः मान टाकली आहे. विशेषतः २२ गावांच्या शेती हद्दीतील पिके पाण्याअभावी शेवटच्या घटका मोजत असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता वाढली असून, पाटबंधारे विभागाने हक्काचे उन्हाळी आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. “वेळेत पाणी मिळाले नाही तर हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे जळून जाईल,” अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन पाणी पुरवठ्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
वैद्यकीय सल्ला –
वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. उष्माघात, डोकेदुखी, अंगदुखी आणि निर्जलीकरणाच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचेही समोर येत आहे.





