Dattatray Bharne : इंदापूरचा वाढता राजकीय दबदबा! कृषिमंत्री भरणे यांच्या नेतृत्वाची राज्यभर छाप
Dattatray Bharne : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यात विकासकामांचा धडाका; रस्ते, पाणी आणि सिंचनासाठी विक्रमी निधी उपलब्ध.

Dattatray Bharne – राज्याचे कृषिमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्याने विकास, संघटनात्मक ताकद आणि राजकीय समन्वयाच्या जोरावर राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, कृषी क्षेत्रातील बदल, सहकार क्षेत्रातील समन्वय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभावी कामकाजामुळे तालुक्याचा राजकीय दबदबा वाढताना दिसत आहे.
(स्व) अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात घडलेल्या कृषिमंत्री भरणे यांनी राज्याच्या कृषी खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेतकरी हिताच्या योजनांना गती दिली आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून आधुनिक शेती, सिंचन, पीकविमा, कृषी यांत्रिकीकरण आणि शेतकरी कल्याणाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याने ग्रामीण भागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
इंदापूर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि ग्रामीण आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावागावात विकासकामांचा वेग वाढल्याने तालुक्याचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत करण्यासाठी कृषिमंत्री भरणे सातत्याने प्रयत्नशील आहेत.
(स्व) अजित पवार यांच्या पश्चात पक्ष संघटना टिकवून ठेवण्याबरोबरच नवीन कार्यकर्त्यांना संधी देत पक्षवाढीसाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत विकासासाठी एकत्र येण्याची भूमिका घेत भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत समन्वय साधत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विचारांच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक भक्कम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. येत्या काळात होणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतही बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सहकार क्षेत्रात एकजूट आणि विकासाभिमुख भूमिका कायम ठेवण्याचा प्रयत्न कृषिमंत्री भरणे यांच्या माध्यमातून सुरू असल्याचे बोलले जात आहे.
कृषिमंत्र्यांच्या नेतृत्वाला जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तसेच इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामपातळीवरील नेतृत्वाची मजबूत साथ लाभत आहे. शासनाच्या योजना आणि विकासकामे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वच स्तरांवर समन्वयाने काम सुरू असल्याने इंदापूर तालुक्याची राज्यातील राजकीय ताकद अधिक वाढताना दिसत आहे.






