Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक
Fire News : चिंबळी फाटा परिसरातील पॉलीमार्क इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग लागली. साहित्य व यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान झाले असून शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज आहे.

Fire News : चिंबळी फाटा परिसरातील पॉलीमार्क इंडस्ट्रीज कंपनीला आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कंपनीतील साहित्य, यंत्रसामग्री आणि इतर मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार या दुर्घटनेत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग लागल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर नगरपरिषदांच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आग इतर भागात पसरणार नाही, यासाठीही जवानांनी खबरदारी घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, आळंदी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. मात्र, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अधिकृत आकडा तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.





