Bhimashankar : भीमाशंकरचा कायापालट होणार! राज्य शासनाकडून १७२ कोटींचा तरतूद; मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ डेडलाईन
Bhimashankar : "स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार"; विकास आराखड्याबाबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन.

Bhimashankar – श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी राज्य शासनाने सुमारे १७२ कोटी २२ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला गती दिली असून मे २०२७ पर्यंत कामे पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवार दि.१८ रोजी दिली. मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे विविध तिर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व संबंधित अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीची माहिती देताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात अत्याधुनिक बसस्थानक,
वाहनतळ सुविधा आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध वळण रस्ते व रस्ते रुंदीकरणाची कामे हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.सध्या २.७ मीटर रुंदीचे असलेले रस्ते ७ मीटरपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहेत.तसेच भक्त आणि पर्यटकांसाठी पादचारी मार्ग, आच्छादित मार्गिका, आकर्षक फरशीकरण, मुक्त रंगमंच,२५७ केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नवीन पोलीस ठाणे आणि विश्रामगृह उभारण्यात येणार आहे.
भविष्यातील विकास आराखड्याअंतर्गत हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण परिसरात उपकेंद्र उभारणे, रोपमार्ग सुविधा सुरू करणे, एमटीडीसीच्या भीमाशंकर विश्रामस्थळाचा विकास आणि राजापूर येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.आमदार बाबाजी काळे यांनी सुचविलेल्या विविध कामांचाही आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
“भीमाशंकर हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटन केंद्र आहे. या विकास आराखड्यामुळे भक्तांना आधुनिक सुविधा मिळतील, पर्यटनाला चालना मिळेल. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.”
– दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री.






