Accident Case : ओव्हरटेकचा प्रयत्न दोन तरुणांच्या जीवावर; मलठणमध्ये कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Accident Case : अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; जखमींना मदत न करताच कारचालक पसार,

शिरूर : अष्टविनायक महामार्गावर भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवित ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न दोन तरुणांच्या जीवावर बेतला.
मलठण (ता. शिरूर) येथील स्नेहल हॉटेलसमोर रविवारी (दि. १) रात्री पावणे नऊच्या सुमारास एर्टिगा कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अजय बाळू देवकर (वय २८, रा. कवठे येमाई) आणि किरण अर्जुन चोरे (वय २४, रा. डोंगरगण, चोरेवस्ती) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मलठण बाजूकडून कवठे येमाईच्या दिशेने मारुती सुझुकी एर्टिगा कार (क्र. एमएच ०३ ईएफ ६५५९) जात होती. स्नेहल हॉटेलसमोर कारचालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालवत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी समोरून येणाऱ्या होंडा युनिकॉर्न दुचाकीला कारची जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकीवरील अजय देवकर आणि किरण चोरे हे दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळी थांबून जखमींना वैद्यकीय मदत करण्याऐवजी तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. अपघातग्रस्त कार घटनास्थळी सोडून चालक पसार झाल्याने त्याच्या शोधाचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अपघातानंतर मदत न करता पसार झालेल्या चालकाच्या वर्तनाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी सुरेश मारुती चोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार कारचालकाचा शोध घेण्यासाठी शिरूर पोलिसांकडून तपास सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक खटिंग पुढील तपास करीत आहेत.
या अपघातामुळे दोन तरुणांचा अकाली मृत्यू झाल्याने देवकर आणि चोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अष्टविनायक महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन, निष्काळजी वाहनचालक आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याच्या प्रकारांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
महामार्गावरील वाहतूक नियंत्रण आणि रस्ता सुरक्षा उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या घटनेने निर्माण झाली आहे.





