Festive season : साखरेचे भाव गगनाला; सणासुदीत दरवाढीचा फटका
Festive season : पिंपरी-चिंचवडमध्ये किरकोळ बाजारात ८२ रुपयांपर्यंत भाव

पिंपरी – चहातील साखर असो किंवा सणासुदीची मिठाई. आता प्रत्येक गोड घास महागणार आहे. साखरेच्या दराने अल्पावधीत मोठी उसळी घेतली आहे. पिंपरी-चिंचवडच्या किरकोळ बाजारात साखरेचा भाव ८२ रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या घरखर्चावर अतिरिक्त भार पडणार आहे.
देशभरात साखरेच्या किमतीत अलिकडे मोठी वाढ झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये साखरेच्या घाऊक दरातही मोठी वाढ झाली आहे. कमी उत्पादन, घटलेला प्रारंभिक साठा आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. तसेच काही बड्या व्यापा-यांनी साखरेचा साठा केल्याची चर्चा सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये या दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. चहा, शिरा, लाडू, पुरणपोळीपासून मिठाईपर्यंत सर्वच पदार्थांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हॉटेल, बेकरी आणि मिठाई व्यावसायिकांनाही वाढलेल्या कच्च्या मालाचा फटका बसत आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढणार आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात देशात साखरेचा वापर सामान्यतः वाढतो. त्यामुळे पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान सरकारसमोर आहे.
केंद्राची दरवाढ रोखण्यासाठी धडपड
दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत १० लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. देशांतर्गत उपलब्धता वाढवून दरावर नियंत्रण आणण्याचा यामागचा उद्देश आहे. याशिवाय साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी व्यापाऱ्यांच्या साठ्यावरही मर्यादा घालण्यात आली आहे.
सरकारने बाजारातील उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. आयातीत साखर बाजारात दाखल झाल्यानंतर पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर काही प्रमाणात स्थिर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत सणासुदीच्या खरेदीचे गणित सर्वसामान्यांना जपून करावे लागणार आहे.
रोज दर कसे वाढतात?
साखरेचे उत्पादन आधीच थांबले असून सध्या जमा साठ्यातील साखरेची विक्री होत आहे. साखर पेट्रोलियम पदार्थ किंवा सोन्या-चांदीप्रमाणे बाहेरुन आयात केली जात नाहीत. मग साखरेचे दर रोज कसे वाढत आहेत? साखरेचा साठा करुन रोज दर वाढवत नफाखोरी केली जात आहे का? असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रोजच्या बदलत्या दरांमुळे लहान व्यापारी देखील त्रस्त झाले आहेत. ज्यांनी जुन्या दरांनी साखर घेतली आहे ते ८० रुपयांपेक्षा कमी किंमतीत विक्री करतात आणि ज्यांनी नव्या दराने आता खरेदी केली आहे त्यांना महाग विकावी लागत आहे. याचा थेट परिणाम व्यवसायावर होत असल्याने दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.





