Drug Abuse In Dehu: देहूत गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट; अल्पवयीन मुलेही नशेच्या विळख्यात
Drug Abuse In Dehu: अल्पवयीन मुले नशेच्या आहारी

– रामकुमार आगरवाल
देहूगाव- तीर्थक्षेत्र देहू परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याने नागरिक आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः अल्पवयीन मुले नशेच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. नशेतून वाद, शिवीगाळ, मारामारी, महिलांची छेडछाड तसेच चोरीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
सिद्धेश्वर मंदिर, मुख्य मंदिरामागील परिसर, स्मशानभूमी, गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदी घाट तसेच नगरपंचायतीलगतचा दर्गा परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पहाटे ५ ते ९ आणि सायंकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत संशयास्पद हालचाली वाढत असल्याची तक्रार आहे. अल्पवयीन मुलांचा नशेच्या आहारी जाण्याचा प्रकार गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या मुलांपर्यंत गांजा किंवा अन्य अमली पदार्थ कोण पोहोचवते, त्याचा पुरवठा कुठून होतो आणि त्यामागे कोणते जाळे आहे, याचा तपास करावा, तसेच अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीत सार्वजनिक ठिकाणी नशेचे अड्डे निर्माण होणे गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी. सीसीटीव्ही निगराणी वाढवावी. संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. अमली पदार्थ पुरवठ्याच्या मुख्य सूत्रधारांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे
नागरिकांकडून पोलीस तसेच नियंत्रण कक्षाला वारंवार माहिती दिली जाते. त्यानंतर गस्तीवरील पोलीस घटनास्थळी पोहोचतात. मात्र पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा गर्दुल्ल्यांचा वावर सुरू होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे केवळ गस्तीपुरती कारवाई न करता संबंधित ठिकाणी सातत्याने लक्ष ठेवण्याची मागणी होत आहे. साध्या वेशातील पोलिसांची विशेष पथके नियुक्त करून या अड्ड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गांजा विक्रीला आळा घालण्याची गरज
देहू परिसरात गांजा व अन्य अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने नशेच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच गर्दुल्ल्यांच्या अड्ड्यांवर नियमित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Crime News : शिरुरच्या लॉजिंगमध्ये तरुणीवर अत्याचार; ७ जणांचा सहभाग, एकाला अटक





