Pratap Sarnaik : महाराष्ट्रात धंदा करायचाय? मग मराठी शिकाच! मंत्री प्रताप सरनाईक यांचा थेट इशारा
Pratap Sarnaik : पक्षप्रवेश आणि विधान परिषद उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम; सरनाईक यांनी मांडली पक्षाची बाजू.

Pratap Sarnaik – राज्यातील रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर, ई-बाइक टॅक्सी यासारख्या व्यावसायिक चालकांना मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यात व्यवसाय करायचा असेल, तर मराठी भाषा येणे आवश्यक आहे, अशा शब्दांत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (दि. ३०) ठणकावून सांगितले.
तसेच, महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मेपासून कारवाई होणारच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री सरनाईक यांनी पिंपरीतील वल्लभनगर बस स्थानकाची गुरुवारी पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, नगरसेविका सुलभा उबाळे, भाजपचे सदाशिव खाडे, पुणे बस विभाग नियंत्रण अधिकारी अरुण सिया,
प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी आदित्य जाधव आदी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, मराठी सक्ती हा राज्य सरकारचा सन १९८९ चा नियम आहे. त्यामध्ये मागील आठवड्यात सुधारणा केली आहे. रिक्षा, टॅक्सी, ओला-उबेर चालक सर्वांना मराठी सक्ती अनिवार्य आहे.
प्रवासी मराठीत बोलत असतील आणि चालकाला मराठी समजत नसेल, तर वादावादी होते. त्यातून गुन्हे दाखल होतात. याबाबत अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यामुळे मराठी सक्तीचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठी आली पाहिजे. मराठी भाषा शिकावी लागेल.
आगारातील सुलभ स्वच्छतागृहात महिलांसाठी शुल्क आकारु नये, असा निर्णय घेतलेला आहे. तसे असताना पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. शौचालय चालकांनी महिलांकडून पैसे घेणे योग्य नाही. तसेच, राज्य परिवहन विभागाने स्वच्छता कर आकारणीस सुरुवात केली आहे.
तसेच, चालक व वाहकांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला असून आवश्यक सोयी-सुविधांच्या कामांना तत्काळ मंजुरी द्यावी. तसेच, प्रवासी सेवा अधिक सक्षम व सुकर करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
बच्चू कडूंबाबत एकनाथ शिंदेंकडून निर्णय
माजी आमदार बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश झाला असून त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. त्यावरून बोलताना सरनाईक म्हणाले की, बच्चू कडू हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे कार्यकर्ते आहेत. शेतकरी आणि दिव्यांगांसाठी त्यांनी मोठे काम केले आहे. अशा कार्यकर्त्याला विधानपरिषदेवर संधी देण्याचा निर्णय मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यांचा निर्णय आमच्या पक्षात अंतिम असतो आणि त्यात काहीही चुकीचे नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.






