Khopoli News: खोपोलीत नवजात मुलीचा मृत्यू; रुग्णालयावर नातेवाईकांकडून गंभीर आरोप
Khopoli News: औषधामुळेच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

खालापूर – प्रसूतीनंतर तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या शाहिस्ता जळगावकर यांच्या आठ दिवसांच्या नवजात मुलीचा मृत्यू झाल्याची घटना खोपोलीत घडली. डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळेच मुलीची प्रकृती खालावून तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहिस्ता जळगावकर यांची आठ दिवसांपूर्वी डॉ. केजरीवाल यांच्या रुग्णालयात प्रसूती झाली होती. मंगळवारी (दि. ६) त्या ड्रेसिंगसाठी रुग्णालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या नवजात मुलीलाही तपासणीसाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलीला कावीळ झाल्याचे सांगून औषध लिहून दिले. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचे चार थेंब नवजात मुलीला देण्यास सांगितले होते.
औषध दिल्यानंतर काही वेळातच मुलीच्या नाकातून रक्त आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावल्याने तिला पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
यानंतर नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. नवजात मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. औषधामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असला, तरी त्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या प्रकरणी खोपोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.




