पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज बाधितांच्या आकड्यामध्ये सातने भर पडली आहे. त्यामुळे बाधितांच्या आकड्याने दीड शतक ओलांडत 151 चा आकडा गाठला आहे. आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सहा जणांचा तर पुण्यातील एकाचा समावेश आहे. या सर्वांना बाधित रुग्णांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आल्यामुळे करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आजपर्यंत करोनातून 62 जणांची मुक्तता झाली आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून रोज करोनाबाधितांच्या आकड्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये रोज दहा ते बारा जणांना लागण झाली आहे. तर आज पुन्हा सहा जणांना करोनाची लागण झाली आहे. बुधवारी प्रतीक्षेत असलेल्या संशयितांचे अहवाल आज (गुरुवारी) प्राप्त झाल्यानंतर सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये सकाळच्या टप्प्यात तीन जणांचे तर सायंकाळच्या टप्प्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पहिल्या टप्प्यात साडेअकरा वाजेपर्यंत आलेल्या अहवालामध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेले दोन पुरुष हे 18 आणि 30 वर्षे वयोगटातील आहेत. ते चिंचवड स्टेशन परिसरातील आहेत. तर वाकडेवाडी येथील 32 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यात आलेल्या अहवालानुसार 4 जणांना करोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 15 वर्षीय मुलाचा समावेश आहे. तीन स्त्रियांमध्ये एका सहा महिन्यांच्या बालिकेस 16 वर्षीय तरुणीसह 28 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण पिंपळे गुरव, खराळवाडी व तळवडे येथील रहिवासी आहेत. आजच्या रुग्णांसह शहरातील बाधितांचा आकडा हा 151 वर पोहोचला आहे. तर आज 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व दोन्ही अहवाल निगेटिव्ह आलेल्या तिघा जणांची करोनामधून मुक्तता झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तीनही रुग्ण थेरगाव आणि रुपीनगर परिसरातील आहेत.
आज गुरुवारी नव्याने 176 संशयित महापालिकेच्या वायसीएममध्ये दाखल झाले असून, त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आजपर्यंत महापालिकेच्या वतीने 3637 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 3310 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आज संशयित म्हणून दाखल झालेल्यांच्या घशातील स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या सर्वांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. करोनामुळे आजपर्यंत एकूण 7 जणांचे निधन झाले आहे. त्यामध्ये शहरातील तीन तर शहराबाहेरील चौघांचा समावेश आहे. एकूण 62 रुग्णांची आतापर्यंत करोनामधून मुक्तता झाली आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 77 आहे.
सहा महिन्यांच्या बालिकेला बाधा
आज करोनाची बाधा झालेल्यांमध्ये एका महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांमध्ये लहान मुलांमध्ये करोना संक्रमणाचा वेग वाढल्याचे समोर आले आहे. मंगळवारी एका दीड महिन्याच्या बाळाला करोनाची लागण झाली होती. लहाण बाळांशिवाय 1 वर्ष ते 15 वर्षांच्या लहान मुलांमध्येही करोनाचे संक्रमण वाढत असल्याचे समोर आले आहे.