Glenn Maxwell Retirement : तीन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell Retirement) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह प्रथम श्रेणी आणि लिस्ट-ए क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून क्रीडा जगताला मोठा धक्का दिला आहे.

Glenn Maxwell Retirement : जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या वादळी आणि आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांच्या नाकीनऊ आणणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या एका दिग्गज खेळाडूने अखेर क्रिकेटच्या मुख्य मंचावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell Retirement) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह प्रथम श्रेणी आणि लिस्ट-ए क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून क्रीडा जगताला मोठा धक्का दिला आहे.
‘द फायनल वर्ड’ या पॉडकास्टवर बोलताना मॅक्सवेलने आपल्या या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. मात्र, आपल्या शानदार कारकिर्दीला पूर्णविराम देताना त्याच्या मनात एक मोठी खंत कायम राहिली. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा निरोपाचा सामना ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळण्याचे त्याचे स्वप्न होते; परंतु ही संधी हुकल्याने एका अपूर्ण इच्छेसह त्याला मैदानाबाहेर पडावे लागत आहे.
आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत बोलताना मॅक्सवेलने (Glenn Maxwell Retirement) स्पष्ट केले की, ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाकडून त्याच्यावर कसलाही दबाव नव्हता. मेलबर्नच्या मैदानावर अखेरचा सामना खेळण्याची चर्चा जरूर रंगली होती, तरीही भविष्याची दिशा ओळखून त्याने स्वतःहून ही वाट मोकळी केली. २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धा नजरेसमोर ठेवून पुढील १२ ते २४ महिन्यांत ऑस्ट्रेलियन संघात मोठ्या बदलांची नांदी होणार आहे.
अशा महत्त्वाच्या टप्प्यावर नव्या आणि तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणे आवश्यक आहे, कारण केवळ बिग बॅश लीगसारख्या स्पर्धांमधून हा अनुभव मिळू शकत नाही, अशी प्रामाणिक कबुली एका वरिष्ठ खेळाडूच्या नात्याने मॅक्सवेलने दिली.
Glenn Maxwell calls time on a remarkable T20I career! https://t.co/NgOS7SSlgJ https://t.co/FEH31SSGGH
— cricket.com.au (@cricketcomau) November 2, 2026
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटला अलविदा केले असले, तरी मॅक्सवेलच्या फटक्यांची आतषबाजी चाहत्यांना टी-२० फ्रँचायझी क्रिकेटमध्ये पाहायला मिळत राहील. १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बिग बॅश लीगच्या २०२६-२७ हंगामात तो मेलबर्न स्टार्सचे प्रतिनिधित्व करताना मैदानात उतरेल.
एकूण टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल ११,३६९ धावा आणि २१४ बळी घेणाऱ्या या दिग्गज खेळाडूसाठी हा निर्णय भावनिकदृष्ट्या अतिशय जड होता. कारकिर्दीची एवढी वर्षे एकत्र घालवल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना निवृत्तीचा निर्णय सांगणे अपेक्षेपेक्षा जास्त कठीण ठरल्याचे सांगत मॅक्सवेलने (Glenn Maxwell Retirement) आपल्या भावना व्यक्त केल्या.
मॅक्सवेलचे आपल्या कारकिर्दीतील ५ मोठे विक्रम
- एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद शतक.मॅक्सवेलने २०२३ च्या विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध ही कामगिरी केली, जिथे त्याने अवघ्या ४० चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.
- एकदिवसीय सामन्यांमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला नॉन-ओपनर (सलामी नसलेला फलंदाज) असणे. त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना, त्याने २०१ धावांची नाबाद खेळी केली.
- एकदिवसीय सामन्यांमध्ये आठव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रमही ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे. त्याने वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात पॅट कमिन्ससोबत आठव्या विकेटसाठी २०२ धावांची भागीदारी केली, जो एक विक्रम आहे.
- ग्लेन मॅक्सवेल हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज देखील आहे. त्याने एकूण ५ शतके झळकावली असून, त्याचे सर्वात जलद शतक भारताविरुद्ध केवळ ४७ चेंडूंमध्ये पूर्ण झाले.
- एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० किंवा त्याहून अधिक डाव खेळलेल्या फलंदाजांची यादी पाहिल्यास मॅक्सवेलच्या जादूचा आणखी एक पैलू दिसून येतो. त्या यादीत मॅक्सवेलचा स्ट्राइक रेट सर्वोत्तम आहे.






