करोनामुक्ती 70 हजारांवर…

पुणे-शहरात करोना बाधितांच्या संख्येत बुधवारी पुन्हा वाढ झाली असून, 1,617 नवीन बाधित सापडले आहेत. दिवसभरात 1,369 जण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ठणठणीत बरे झालेल्या संख्येने 70 हजारांचा टप्पा पार केला आहे. शहरातील करोनामुक्तचे प्रमाण 80.47 टक्के इतके आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत करोनामुळे 31 जणांचा मृत्युची नोंद झाली आहे.
लॉकडाऊन शिथिल झाले नागरिकांची वर्दळ वाढू लागली. त्यातच सणासुदीच्या खरेदीसाठी मागील दहा दिवसांपासून बाजारपेठा अक्षरश: गर्दीने फुलल्या आहेत. ही गर्दी पाहिल्यावर पुण्यात कधी करोना नव्हताच, असे चित्र वाटत होते. मात्र, या गर्दीचा परिणाम आता जाणवतो का? असा प्रश्न पडला आहे. कारण, बाधित संख्या सोळाशेच्या पुढे गेली आहे.
यामुळे आतापर्यंतची एकूण बाधित संख्या 87,317 वर पोहचली आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 26) दिवसभरात 6,164 संशयितांची करोना चाचणी करण्यात आली. तर आतापर्यंत एकूण 4 लाख 20 हजार 458 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.
शहरातील विविध रूग्णालयात 1, 490 बाधितांवर उपचार सुरू असून, दोन दिवसांपासून सक्रीय बाधितांची संख्या वाढत आहे. तर 812 अत्यवस्थांपैकी 492 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. तर 320 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. दरम्यान, शहरातील क्वारंटाईन व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आज 37 हजार 268 व्यक्तीं क्वारंटाईन आहेत.




