Blood Donation : रक्तदान कोणाला करता येते आणि काय घ्यावी काळजी? ‘ही’ नियमावली नक्की वाचा
Blood Donation : रक्तदान शिबिरात सहभागी होताना सोबत आपली जुनी प्रिस्क्रिप्शन्स (जर काही औषधे सुरू असतील तर) नक्की घेऊन जावीत. तुमचे एक पाऊल कोणाचे तरी प्राण वाचवू शकते, त्यामुळे जास्तीत जास्त मित्रपरिवारासह या जीवनदायी मोहिमेत सहभागी व्हावे.

Blood Donation : “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असे म्हटले जाते. आपले केवळ ३० मिनिटे एखाद्या रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबाला नवजीवन देऊ शकतात. मात्र, रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काही तांत्रिक निकष आणि आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.
रक्तदानासाठी पात्रतेचे निकष (Eligibility Criteria)
रक्तदान करण्यापूर्वी दात्याने खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
वय आणि वजन: रक्तदात्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे (नियमित रक्तदात्यांना ६५ वर्षांपर्यंत मुभा). शरीराचे वजन किमान ५० किलो असणे अनिवार्य आहे.
हिमोग्लोबिन: रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅमपेक्षा जास्त असावे.
विश्रांती आणि आहार: रक्तदानाच्या आदल्या दिवशी पुरेशी झोप झालेली असावी. रक्तदानापूर्वी किमान ३ तास आधी हलका नाश्ता किंवा लंच घेतलेला असावा. रिकाम्या पोटी रक्तदान करू नये. नाश्त्यानंतर ३० मिनिटे आणि जेवणानंतर १ तासाचे अंतर राखूनच रक्तदान करावे.
व्यसन: रक्तदानाच्या २४ तास आधी मद्यप्राशन करू नये. तसेच ४-६ तास आधी धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन टाळावे.
पाणी: रक्तदानापूर्वी आणि नंतर ४ ते ५ दिवस भरपूर पाणी प्यावे.
वैद्यकीय इतिहास आणि खबरदारी –
आजार आणि औषधे: साखर (Sugar), थायरॉईड आणि रक्तदाब (BP) गोळ्यांनी नियंत्रणात असल्यास अशी व्यक्ती रक्तदान करू शकते. मात्र, इन्सुलिन घेणारे मधुमेही, हृदयविकार, फिट येणे, रक्तस्त्रावाचे विकार किंवा फुफ्फुसाचे गंभीर आजार असलेल्यांनी रक्तदान करू नये. अँटीबायोटिक्सचा शेवटचा डोस घेऊन १५ दिवस पूर्ण झालेले असावेत.
लसीकरण आणि संसर्ग: कोणत्याही लसीकरणानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते. सर्दी, खोकला, ताप किंवा विषाणूजन्य आजार असल्यास ७ दिवस रक्तदान टाळावे.
इतर अटी: टॅटू किंवा इयर पियर्सिंग (कान टोचणे) करून एक वर्ष पूर्ण झालेले असावे. मागील ३ महिन्यात रक्तदान केलेले नसावे.
महिलांसाठी: मासिक पाळी सुरू असताना, गरोदरपणात किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी रक्तदान करू नये.
रक्तदानानंतर घ्यायची काळजी (Post-Donation Care)
रक्तदान प्रक्रिया सुरक्षित असली तरी, काही वेळा मळमळ किंवा चक्कर येण्यासारखे प्रकार घडू शकतात. ते टाळण्यासाठी खालील गोष्टी पाळाव्यात:
१. आराम: रक्तदानानंतर किमान १० मिनिटे आडवे पडून राहावे. डॉक्टरांच्या सूचनेशिवाय बेड सोडू नये.
२. रक्तस्त्राव: सुई टोचलेल्या जागी रक्तस्त्राव झाल्यास हात वर करून त्या जागेवर दाब द्यावा. बँडेज किमान ४ तास काढू नका.
३. खाद्यपेय: रक्तपेढीने दिलेला अल्पोपहार आणि रिफ्रेशमेंट्स नक्की घ्या, जेणेकरून रक्तातील ग्लुकोजची पातळी टिकून राहील. पुढील २४ तास भरपूर पाणी प्यावे.
४. श्रम टाळा: रक्तदान केल्यानंतर किमान २४ तास जड व्यायाम, वजन उचलणे किंवा कष्टाची कामे टाळावीत.
५. व्यसन: रक्तदानानंतर २४ तास मद्यपान आणि ६ तास धूम्रपान करू नये.
रक्तदान शिबिरात सहभागी होताना सोबत आपली जुनी प्रिस्क्रिप्शन्स (जर काही औषधे सुरू असतील तर) नक्की घेऊन जावीत. तुमचे एक पाऊल कोणाचे तरी प्राण वाचवू शकते, त्यामुळे जास्तीत जास्त मित्रपरिवारासह या जीवनदायी मोहिमेत सहभागी व्हावे.
– डाॅ. भार्गवी विजय बडे
[email protected]
www.drbadevshl.com





