नवी दिल्ली: जग कोरोना महामारीच्या विळख्यातून बाहेर पडत असतानाच आता भारतासमोर त्यापेक्षाही गंभीर सार्वजनिक आरोग्य संकट उभे राहिले आहे. ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या श्वसनरोग तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, वाढते वायू प्रदूषण हे भारतीय लोकसंख्येसाठी ‘सायलेंट किलर’ ठरत असून, तातडीने पावले न उचलल्यास देशात श्वसनाच्या आजारांची मोठी लाट येण्याची शक्यता आहे. श्वसनविकारांच्या रुग्णांत ३० टक्क्यांनी वाढ तज्ज्ञांच्या मते, एकट्या दिल्लीत डिसेंबर महिन्यात श्वसनाच्या रुग्णांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये अशा रुग्णांची संख्या मोठी आहे ज्यांना आयुष्यात पहिल्यांदाच श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. लंडनच्या सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ राजय नारायण यांनी स्पष्ट केले की, वायू प्रदूषणामुळे केवळ फुफ्फुसांचेच नव्हे, तर हृदयविकार, मज्जासंस्थेचे आजार आणि इतर गंभीर समस्या उद्भवत असल्याचे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत. हृदयविकाराचा धोका वाढला गेल्या दशकात जगभरात हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यासाठी केवळ लठ्ठपणा कारणीभूत नसून, वाहने आणि विमानांमधून निघणारा विषारी धूर हेदेखील मुख्य कारण असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. शहरी भागातील प्रदूषित हवा थेट हृदयाच्या आरोग्यावर घाला घालत आहे. तातडीच्या उपाययोजनांची गरज ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (NHS) डॉक्टरांनी सांगितले की, केवळ प्रदूषण नियंत्रण आता पुरेसे नाही. ज्याप्रमाणे भारताने टीबी (क्षयरोग) विरुद्ध प्रभावी लढा दिला, त्याच धर्तीवर आता श्वसनविकारांच्या प्रतिबंधासाठी आणि उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि सरकारी पुढाकाराची गरज आहे. जर वेळीच खबरदारी घेतली नाही, तर भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर येणाऱ्या काळात अभूतपूर्व ताण येऊ शकतो, असा इशाराही या वैद्यकीय पथकाने दिला आहे.