U Min Aung Hlaing : म्यानमारचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग भारतभेटीवर; बिहारमधील महाबोधी मंदिरात घेतले दर्शन
म्यानमारचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग हे आज पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर (U Min Aung Hlaing) दाखल झाले असून आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बिहारमधील गयाजी जिल्ह्यातल्या महाबोधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

U Min Aung Hlaing : म्यानमारचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग हे आज पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर (U Min Aung Hlaing) दाखल झाले असून आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बिहारमधील गयाजी जिल्ह्यातल्या महाबोधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. लाइंग यांच्या समवेत अनेक कॅबिनेट मंत्री आणि उद्योगपतींचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारतभेटीवर आले आहे.
विमानतळावर आगमन झाल्यावर बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि केंद्रिय कृषी राज्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना औपचारिक मानवंदना (U Min Aung Hlaing) देण्यात आली. भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख चार ठिकाणांपैकी एक असलेल्या महाबोधी मंदिराला त्यांनी भेट दिली आणि प्रार्थना केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जेथे भगवान बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले, त्या महाबोधी मंदिलाला लाइंग यांनी दिलेली भेट ही भारत आणि म्यानमारमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संबंध अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले.
आँग लाइंग यांच्या पाच दिवसांच्या भारत दौऱ्यात व्यापार, संपर्क व्यवस्था, सीमा सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. म्यानमारमध्ये अलिकडेच झालेल्या संसदीय निवडणुकांनंतर लाइंग (U Min Aung Hlaing) यांची देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली. लष्करी अध्यक्षपदावरून संसदीय रचनेतून देशाचे अध्यक्ष झाल्यानंतर दोनच महिन्यांनी ते भारत भेटीवर आले आहेत.
मुंबईलाही देणार भेट…
लाइंग हे १ जून रोजी नवी दिल्लीत झालेल्या बिग कॅट अलायन्सच्या निमित्ताने भारतभेटीवर येणार होते. मात्र ही परिषद पुढे ढकलली गेली. आपल्या दौऱ्यादरम्यान ते सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून दोन्ही देशांदरम्यानच्या ऐतिहासिक आणि सभ्यता विषयक संबंधांना अधिक घट्ट करण्याविषयी चर्चा करतील. ते उद्योग विषयक परिसंवादामध्येही भाग घेणार आहेत. दिनांक २ जून रोजी लाइंग उद्योग आणि व्यापारी प्रतिनिधींची भेट घेण्यासाठी मुंबईलाही भेट देणार आहेत.






