Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजावर हल्ला, एक ठार
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काश्म बेटाजवळून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर आज पहाटेच्या सुमारास हल्ला झाला.

Strait of Hormuz – होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काश्म बेटाजवळून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर आज पहाटेच्या सुमारास हल्ला झाला. त्यात जहाजावरील एक कर्मचारी ठार झाला आणि अन्य चौघे जखमी झाले, असे इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितले.
कालच इराणने जवळच्या देशांना या सागरी मार्गातील वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला.
हा हल्ला दहशतवादी शत्रूंकडून झाल्याचे काश्म गव्हर्नरांनी म्हटले आहे. मात्र या जहाजावर प्रोजेक्टाईल कोणी डागले होते, हे समजू शकलेले नाही.
अमेरिकेने काही दिवसांपुर्वीच होर्मुझमधून जाणाऱ्या इराणच्या जहाजावर मारा केला होता. मात्र या प्रकरणी अमेरिकेकडूनही कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. अमेरिकेने इराणच्या बंदरांची नाकाबंदी अजूनही कायम ठेवली आहे.
इराणकडून अमेरिकेच्या युद्धनौकांवर बॅलिस्टिकक्षेपणास्त्रे डागली गेली होती. त्याला आता इराणकडून अधिक जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याचे संकेत मिळत आहेत.
काश्म बेट इराणच्या बंदर अब्बास या बंदरापासून २२ किलोमीटरवर आहे. तेथूनच सध्या होर्मूझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीचे नियंत्रण केले जात असते.





