Sheikh Hasina : शेख हसीना यांचे घर आता जुलै उठावाचे संग्रहालय; शहिद कार्यकर्त्यांची नावे सरकारी संस्थांना देणार
बांगलादेशात २०२४ साली झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या स्मृती जतन करण्यासाठी एका संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली असून कडेकोट बंदोबस्तामध्ये या संग्रहालयाचे आज उद्घाटन करण्यात आले.

Sheikh Hasina – बांगलादेशात २०२४ साली झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या स्मृती जतन करण्यासाठी एका संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली असून कडेकोट बंदोबस्तामध्ये या संग्रहालयाचे आज उद्घाटन करण्यात आले. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अधिकृत निवासस्थानामध्येच हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या उग्र आंदोलनानंतर शेख हसीना यांनी देशातून पलायन करून भारतात आश्रय घेतला आहे. तेंव्हापासून राजधानी ढाकामधील गनाभाबन भागातील पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेले निवासस्थान बंदच होते.
पंतप्रधान तारिक रहमान यांनी जुलै सामुहिक उठाव स्मृती संग्रहालयाचे उद्घाटन केले. शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतात आश्रय घेतला होता. त्या दिवसालाच जुलै उठावाचा स्मृतिदिन मानून या संग्रहालयाचे उद्घाटन आजच्याच दिवशी करण्यात आले.
फॅसिस्टविरोधी चळवळीतील मारेकऱ्यांवर पारदर्शक पद्धतीने, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने कायद्याच्या नियोजित प्रक्रियेद्वारे खटले चालवले जातील, असे रहमान यांनी संग्रहालयाच्या फलकाच्या अनावरणप्रसंगी केलेल्या छोट्याशा भाषणात सांगितले.
कायद्याच्या राज्यासाठी प्रत्येक गुन्ह्याबाबत न्याय होणे गरजेचे आहे, असेही रहमान म्हणाले. याप्रसंगी बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे देखील उपस्थित होते.
जुलै आंदोलनादरम्यान आणि २००९ पासून शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाच्या कार्यकाळात मारल्या गेलेल्या कार्यकर्त्यांची नावे सरकारी संस्थाना दिली जातील, असेही रहमान यांनी जाहीर केले.
बांगलादेशात २०२४ च्या १५ जुलै आणि १५ ऑगस्ट दरम्यान हसीना यांच्या सरकारने आंदोलन चिरडण्यासाठी केलेल्या कारवाईमध्ये १,४०० लोक ठार झाले होते, असे संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्कविषयक कार्यालयाने म्हटले होते. या काळालाच जुलै उठाव असे संबोधले जाते.
हंगामी मुख्य कार्यकारी डॉ. मुहम्मद युनूस यांनी स्थापन केलेल्या विशेष लवादाने मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि नरसंहाराच्या आरोपाखाली शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या आवामी लीग पक्षावरही बंदी घातली गेली आहे. या निर्णयाचे विद्यमान पंतप्रधान तारिक रहमान यांच्या बांगलादेश नॅशनलिस्टट पार्टीच्या सरकारने समर्थन केले आहे. .
जुलै उठावाचा स्मृतिदिन देशभर साजरा
बांगलादेशात आज देशभर जुलै उठावाचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. सरकार, राजकीय पक्ष आणि सामाजिक, सांस्कृतिक संघटनानी यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हसीना यांची राजवट म्हणजे अधाधुंदी आणि हुकुमशाहीचे शासन होते, असा नारा देत विद्यार्थ्यांनी देखील हसीनांच्या सत्तेचा निषेध करणाऱ्या रॅली काढल्या होत्या.
याच निमित्ताने शेख हसीना आज नवी दिल्लीतून आभासी माध्यमाने बांगलादेशातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे देशभरात हिंसाचार भडकू नये यासाठी बांगलादेश सरकारने देशभर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.





