Russia Ukraine War : मस्कच्या ‘स्टारलिंक’ बंदीचा रशियाला मोठा फटका !
रशियन सैन्याला आपले ड्रोन नियंत्रित करण्यासाठी स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवा वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Russia Ukraine War – युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरू असलेल्या युद्धात युक्रेनने तांत्रिक आणि रणनीतिक पातळीवर रशियाला मोठे धक्के देण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनियन ड्रोनने रशियन हद्दीत ८०० किलोमीटरपेक्षा जास्त आत घुसून सिझरान तेल शुद्धीकरण कारखान्याला लक्ष्य केले आहे.
रोसनेफ्टच्या मालकीच्या या कारखान्यावरील हल्ल्यानंतर तिथे भीषण आग लागली. आक्रमणाला आर्थिक रसद पुरवणाऱ्या रशियन तेल मालमत्तांवर आता रोजच हल्ले होत असून हा मे महिन्याच्या दूरगामी योजनेचा भाग असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे.
युद्धभूमीवरील या मोठ्या यशामागे एक महत्त्वाचे तांत्रिक कारण समोर आले आहे. युक्रेनचे संरक्षण मंत्री मिखाइलो फेडोरोव्ह यांनी उघड केले की, रशियन सैन्याला आपले ड्रोन नियंत्रित करण्यासाठी स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवा वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
फेब्रुवारीमध्ये युक्रेनच्या विनंतीवरून इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीने ही कारवाई केली होती. रशियाला अद्याप स्टारलिंकला तोडीस तोड पर्याय सापडलेला नाही, ज्यामुळे रशियाची रणांगणावरील प्रगती मंदावली असून युक्रेनला मोठा तांत्रिक फायदा मिळाला आहे. याशिवाय, गेल्या चार महिन्यांत युक्रेनने रशियन ड्रोन रोखण्याचे प्रमाण दुप्पट केले आहे.
वॉर्निंग्टनस्थित ‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर’च्या मूल्यांकनानुसार, २०२६ च्या सुरुवातीपासून युक्रेनने रशियाची रसद, लष्करी उपकरणे आणि मनुष्यबळाला लक्ष्य करून लांब पल्ल्याच्या हल्ल्यांची जी मोहीम चालवली आहे, त्यामुळे रशियन सैन्याची आक्रमक क्षमता कमालीची क्षीण झाली आहे.
परिणामी, युक्रेनियन सैन्याने २०२४ नंतरची सर्वात लक्षणीय आणि मोठी आघाडी मिळवली आहे. काही हल्ले रशियन भूमीत चक्क १,५०० किमी आतपर्यंत पोहोचल्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर अंतर्गत दबाव वाढला आहे.
दोन्ही बाजूंकडून ड्रोनचा वर्षाव
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रात्रभरात युक्रेनचे १२१ ड्रोन पाडल्याचा दावा केला असून बेलगोरोड प्रांतात आठ जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, रशियानेही युक्रेनच्या नागरी वस्त्यांवर ड्रोन हल्ले सुरूच ठेवले आहेत, ज्यात संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १५,००० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत.
युक्रेनच्या हवाई दलाने गुरुवारी सांगितले की, रशियाने डागलेल्या ११६ पैकी १०९ ड्रोन त्यांनी हवेतच नष्ट केले, मात्र या हल्ल्यांत एका नागरिकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.






