Sri Lanka News : श्रीलंकेत तोतया साधूंकडून ड्रग्ज तस्करी, २२ जणांना अटक
श्रीलंकेत साधूंचा वेश धारण करून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या २२ जणांच्या गटाला पोलिसांनी अटक केली आहे.

Sri Lanka News – श्रीलंकेत साधूंचा वेश धारण करून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या २२ जणांच्या गटाला पोलिसांनी अटक केली आहे.
थायलंडहून येथे बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यावर कुश आणि हशीश हे अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरून या सर्वांना अटक करण्यात आल्याचे श्रीलंकेच्या पोलिसांनी सांगितले.
या सर्वांकडून १.१ अब्ज श्रीलंका रुपये किंमतीचे १२० किलो कुश आणि हशीश जप्त करण्यात आले आहेत. बॅगेच्या तळापाशी खोटेपणाने तळ दाखवून त्याखाली हे अमली पदार्थ दडवून ठेवण्यात आले होते. हे सर्वजण २२ एप्रिलला थायलंडला रवाना झाले होते.
संशयित आरोपी अंपारा, होराना, बोरालेसगामुवा, वड्डूवा, वारकापोला, पिलियांडला, होमगामा, अथुरलिया, अंबालंगोडा, कुडीसपथुवा, मदापाथा आणि बालंगोडा येथील रहिवासी आहेत.
अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सामानात ५ किलोहून अधिक अमली पदार्थ सापडले. त्यामध्ये एकूण १२० किलोपेक्षा जास्त कुश आणि हशीशचा समावेश होता. या सर्वांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, तीन प्रमुख बौद्ध भिक्षू पंथांच्या नेत्यांनी रविवारी एका संयुक्त निवेदनात या तस्करांना तोतया भिक्षू असे संबोधून त्यांना बौद्ध व्यवस्थेतून हद्दपार करण्याची मागणी केली. तसेच अशी तोतयेगिरी रोखण्यासाठी स्वतंत्र कायद्याचीही मागणी केली.





