Indonesia : इंडोनेशियातल्या रेल्वे अपघातात १५ ठार; थांबलेल्या रेल्वेला भरधाव रेल्वेची जोरदार धडक
इंडोनेशियामध्ये सोमवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात १५ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये बहुतेक महिला आहेत.

बेकासी (इंडोनेशिया) – इंडोनेशियामध्ये सोमवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात १५ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये बहुतेक महिला आहेत.
राजधानी जकार्ताच्या जवळ लांब पल्ल्याची एक रेल्वे बेकासी तिमूर स्टेशनपाशी थांबलेल्या एका रेल्वेला पाठीमागून धडकल्याने हा अपघात घडला होता. सर्वात शेवटचा डबा हा केवळ महिलांसाठी आरक्षित होता. त्यामुळे ठार झालेल्या बहुतेक महिला होत्या.
या अपघातात एकूण ८८ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पीटी केरेला अपी इंडोनेशिया या सरकारी रेल्वे कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर बचाव पथकांनी रेल्वेच्या डब्यांखालून सर्व पीडितांना बाहेर काढण्याचे काम पूर्ण केले आहे. आर्गो ब्रोमो आंगग्रेक या लांब पल्ल्याच्या ट्रेनमधील सर्व २४० प्रवासी सुरक्षित होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बेकासी तिमूर स्टेशनजवळ थांबलेल्या रेल्वेला दुसऱ्या प्रवासी रेल्वेने धडक दिली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या मार्गावर नंतर येणारी रेल्वे थांबवली.
या सर्व अपघातांच्या घटनाक्रमाचे विश्लेषण करण्यासाठी आणि अपघाताचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी कमिटी तपास करणार आहे, असे इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाने एका लेखी निवेदनात म्हटले आहे.





