Indonesian : इंडोनेशियाचे प्रवासी जहाज बुडून १३० बेपत्ता; १०७ जणांना वाचवण्यात यश
जवळच्या टगबोट्स आणि इतर ये-जा करणाऱ्या जहाजांच्या मदतीने, शोध पथकांनी रविवार दुपारपर्यंत १०७ लोकांना वाचवले होते आणि सहा मृतदेह बाहेर काढले होते.

Indonesian – इंडोनेशियाचे एक प्रवासी जहाज रविवारी जावा समुद्रामध्ये उलटून झालेल्या दुर्घटनेत किमान १३० प्रवासी आणि कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. या स४वांचा शोध घेतला जात असल्याचे इंडोनेशियाच्या बचाव पथकाने म्हटले आहे.
जहाज उलटल्यानंतर किमान १०७ जणांना वाचवण्यात आले असून ६ प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत. विरो ट्रान्सपोर्ट-८ हे जहाज पूर्व जावामधील सुराबाया येथून दक्षिण कालिमान्तान प्रांतातील बंजारमासिन येथे जात होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या जहाजावरून धोक्याचा इशारा दिला गेला होता. समुद्र खवळलेला असून १० फूट उंच लाटा उसळत असल्याचे या जहाजाच्या कप्तानाने या इशाऱ्यामध्ये म्हटले होते. मात्र नंतर हे जहाज उलटले असून बुडायला लागल्याची माहिती नंतर प्राप्त झाली.
जावा समुद्रामध्ये बंजारमासिन धक्क्यापासून १४८ किलोमीटरवर असताना या जहाजाबरोबरचा संपर्क तुटला. त्यानंतर २ तासांनी रात्री २ वाजण्याच्या सुमारास या दुर्घटनेबद्दलची माहिती मिळाल्याचे बंजारमासिन येथील शोध आणि बचाव संस्थेने सांगितले.
जहाज बुडाल्याची माहिती मिळताच चार बोटी मदतीसाठी रवाना करण्यात आल्या. यात इंडोनेशियाच्या नौदलाच्या जहाजासह हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. जवळच्या टगबोट्स आणि इतर ये-जा करणाऱ्या जहाजांच्या मदतीने, शोध पथकांनी रविवार दुपारपर्यंत १०७ लोकांना वाचवले होते आणि सहा मृतदेह बाहेर काढले होते.





