Ramdas Athawale – राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड होऊन हॅटटि्रक साधल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत येत पत्रकार परिषदेत जोरदार राजकीय फटकेबाजी केली. शिर्डीचा खासदार होण्याची इच्छा होती, मात्र आता मी संपूर्ण राज्याचा खासदार झालो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठिंब्यामुळे ही संधी मिळाल्याचे सांगतानाच मी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलो असलो तरी मी रिपब्लिकन पक्षाचाच उमेदवार असल्याचे स्पष्ट करत काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशात जातीय तेढ निर्माण करण्याचे राजकारण केल्याचा आरोप आठवले यांनी केला. राज्यसभेवर सलग तिसऱ्यांदा निवड झाल्यानंतर रामदास आठवले रविवारी सकाळी शिर्डीत आले होते. तत्पूर्वी त्यांनी साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी खा.आठवले यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. मी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत आलो असलो तरी मी आरपीआयचाच उमेदवार आहे, असे स्पष्ट करत आणखी दोन राज्यांमध्ये पक्षाला संधी मिळाल्यास राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना पुण्यात आमचे सहा नगरसेवक निवडून आले असून, महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसवर टीका करताना रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत बोलताना, पटेल नागरी उड्डाण मंत्री होते. त्यामुळे काही व्यावसायिकांशी त्यांचे संबंध असणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान झाले असून त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, मात्र हा घातपात असल्याचे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.