Jamkhed News: न्हावरा फाटा ते जामखेड रस्त्यावर सभापतींनकडून झाडाझडती
Jamkhed Newsछ आठ दिवसात पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश

Jamkhed News: न्हावरा फाटा ते जामखेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेला प्रचंड भ्रष्टाचार, रस्त्याला पडलेले तडे आणि अपूर्ण कामांमुळे वाढलेले अपघातांचे सत्र यावर दैनिक ‘प्रभात’ने सातत्याने प्रकाश टाकला होता.
जनसामान्यांच्या जीवाशी सुरू असलेल्या या खेळाची गंभीर दखल घेत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुंबईत विधानभवन तातडीची आढावा बैठक आयोजित केली.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी येत्या आठ दिवसांत स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ‘दैनिक ‘प्रभात’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
सन २०१९ पासून सुरू असलेले हे महामार्गाचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी रस्ता पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे, तिथे दोन वर्षे उलटायच्या आतच रस्त्याला मोठमोठ्या भेगा आणि तडे गेले आहेत.
निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने सिमेंट काँक्रीटचा हा रस्ता ठिकठिकाणी खचला असून, यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. दैनिक ‘प्रभात’ने वेळोवेळी छायाचित्रांसह या रस्त्याच्या दुरवस्थेचे वास्तव मांडले होते.
याचीच दखल घेऊन बैठकीत रस्त्याची सद्यस्थिती दर्शविणारे फोटो आणि व्हिडिओ सादर करण्यात आले. तेव्हा अधिकारीही निरुत्तर झाले.
बैठकीत प्रा. शिंदे यांनी रस्त्याचे काम निकृष्ट होण्यामागे नेमकी कोणाची जबाबदारी आहे, याचा शोध घेण्यासाठी त्यांनी पुढील आठ दिवसांत स्वतः स्थळ पाहणी करण्याचे निश्चित केले आहे. या पाहणीनंतर वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून, दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. Jamkhed News
३१ मे पूर्वी अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश
जामखेड शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामात अतिक्रमणांचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ३१ मे पूर्वी ही अतिक्रमणे हटवून रस्ता वाहतुकीयोग्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासाठी नगरपरिषद प्रशासन, महसूल, भूमी अभिलेख, पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने समन्वय साधून तातडीने कारवाई करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधींचा आक्रमक पवित्रा
प्रा. शिंदे यांनी या बैठकीत आक्रमक भूमिका घेत, प्रशासनाला धारेवर धरले. लोकांच्या तक्रारी आणि ‘प्रभात’मधील वृत्तांकनाचा हवाला देत त्यांनी स्पष्ट केले की, निकृष्ट कामामुळे होणारे अपघात ही चिंतेची बाब आहे.
या बैठकीस अधीक्षक अभियंता तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, मधुकर राळेभात, अंकुश ढवळे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. Jamkhed News
हेही वाचा:






