Gold ETF: गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे पाठ फिरवली; गोल्ड ईटीएफमध्ये 31,561 कोटी रुपयाची गुंतवणूक
Gold ETF: जानेवारीत गोल्ड ईटीएफमध्ये 24,040 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. फेब्रुवारीत ती कमी होऊन 5.255 कोटी रुपये इतकी झाली आहे. तर मार्च महिन्यामध्ये ती आणखी कमी होऊन 2.266 कोटी रुपये इतकी झाली. तिमाही पातळीवर गुंतवणूक वाढली असली तरी मासिक पातळीवर गुंतवणूक वेगाने कमी होत असल्याचे दिसून येते.

Gold ETF: आखातातील युद्धामुळे विविध बाजारावर वेगवेगळा परिणाम होत आहे. शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर असतानाच सोने आणि चांदीतील गुंतवणूक काही प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत मार्च अखेरच्या तिमाहीत गोल्ड एक्सचेंज ट्रेड फंडात म्हणजे ईटीएफमध्ये झालेली गुंतवणूक गेल्या वर्षाच्या मार्चअखेरच्या तिमाहीच्या तुलनेत यावर्षी सहा पटीने वाढवून 31,561 कोटी रुपये इतकी झाली आहे.
वार्षिक पातळीवर मार्च अखेरच्या तिमाहीत झालेली गुंतवणूक सहा पटीने वाढली आहे तर तिमाही पातळीवर झालेली गुंतवणूक 36 टक्के वाढली आहे. गेल्या वर्षी मार्चअखेरच्या तिमाहीत गोल्ड ईटीएफमध्ये केवळ 5,654 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
व्यापार युद्ध, रशिया – युक्रेन युद्ध, पॅलेस्टाईन -हमास संघर्ष, आता अमेरिका -इराण युद्ध या कारणामुळे गेल्या काही तिमाहीपासून एकूणच सोने आणि चांदीतील गुंतवणूक वाढत आहेत. त्यामुळे त्या दोन धातूचे दर बर्याच उच्च पातळीवर गेले होते. आता त्यामध्ये बरेच करेक्शन झाले आहे. अशा परिस्थितीत गोल्ड ईटीएफमध्ये झालेली गुंतवणूक वाढत आहे. त्याचबरोबर खातेदारांची संख्या वाढत आहे.
जानेवारीत गोल्ड ईटीएफमध्ये 24,040 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. फेब्रुवारीत ती कमी होऊन 5.255 कोटी रुपये इतकी झाली आहे. तर मार्च महिन्यामध्ये ती आणखी कमी होऊन 2.266 कोटी रुपये इतकी झाली. तिमाही पातळीवर गुंतवणूक वाढली असली तरी मासिक पातळीवर गुंतवणूक वेगाने कमी होत असल्याचे दिसून येते.
कारण जानेवारी महिन्यानंतर जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर बरेच कमी झाले आहेत. जागतिक बाजारात सोने आणि चांदीतील बरीच गुंतवणूक डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्याकडे गेल्यामुळे सोने आणि चांदीच्या दारात घट झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही आणि ईटीएफ फंडावरही झाला असल्याचे दिसून येते.




