अग्रलेख : बहनोंकी गुंज
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या पुणे शहरामध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांशी जो संवाद साधला तो निश्चितच लक्षणीय मानावा लागेल.

Rahul Gandhi : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या पुणे शहरामध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांशी जो संवाद साधला तो निश्चितच लक्षणीय मानावा लागेल.
आणखी काही तासांनीच साजर्या होणार्या राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी अत्यंत चाणाक्षपणे हा विषय निवडला आणि महिलांच्या मनातील भावनांना एक वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे निश्चितच अभिनंदन करावे लागेल.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या या कार्यक्रम मालिकेचे नाव जरी ‘छात्रों की गुंज’ असे असले तरी पुण्यातील कार्यक्रमामध्ये मात्र ‘हजारो बहनों की गुंज’ देशातील लाखो, कोट्यवधी लोकांना ऐकता आली. राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमावर अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून टीका झाली असली तरी आणि भविष्यातही अशा प्रकारची टीका होणार असली तरी ज्या प्रकारे राहुल गांधी यांनी पुण्यातील या कार्यक्रमाला राजकारणविरहित स्वरूप दिले होते ते निश्चितच महत्त्वाचे आहे.
सर्वसाधारणपणे कोणत्याही राजकीय व्यासपीठावर राहुल गांधी उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत असतात. पण पुण्यातील या कार्यक्रमामध्ये त्यांनी कोणत्याही सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचे नाव घेतले नाही. एवढेच नाही तर व्यासपीठावर ज्या मुली संवादासाठी येत होत्या त्या मुली क्वचित जर राजकारणाकडे वळत असतील तर त्यांनी त्यांना तसे वळूही दिले नाही. आपल्याला राजकारण विरहित महिलांच्या विषयावर बोलायचे आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले.
भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे नेते कायमच निवडणूक जिंकण्याच्या आणि लढवण्याच्या मूडमध्ये असताना आणि कायमच एकमेकांवर विखारी टीका करण्याच्या पवित्र्यात असताना राहुल गांधी यांनी सुरू केलेली संवादाची ही प्रक्रिया निश्चितच महत्त्वाची आहे. राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमापूर्वी भारतीय जनता पक्षाने या कार्यक्रमावर नौटंकी अशी टीका केली होती. पण राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या या संवादाच्या कार्यक्रमानंतर त्यांच्यावर टीका करणारे आपोआपच तोंडघशी पडले आहेत.
गेल्याच महिन्यामध्ये राजधानीत जंतर-मंतर येथे जेन झी आंदोलन गाजले होते. त्यापूर्वीच राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम जरी सुरू केला असला तरी पुण्यातील कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी लोकसंख्येतील प्रमुख घटक असलेल्या महिलांना प्राधान्य दिले हे अत्यंत महत्त्वाचे आहे. राहुल गांधी यांच्या या व्यासपीठावर महिलांनी खुलेपणाने आपले विचार व्यक्त केले.
यानिमित्ताने देशातील महिलांना कोणत्या समस्या जाणवतात, त्याचे प्रातिनिधिक स्वरूपही समोर आले. महिलांनी व्यक्त केलेल्या समस्यानंतर ओघानेच राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवर टीका केली आणि मनुस्मृतीमध्ये महिलांना दडपण्याची मानसिकता असल्याने महिलांनी पिंजरा तोडून बाहेर येण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले.
अर्थात मनुस्मृती केवळ प्रातिनिधिक ग्रंथ मानावा लागेल. भारतीय संस्कृतीमध्ये जे धर्म किंवा पंथ अस्तित्वात आहेत त्यापैकी अनेक धर्मांमध्ये आणि पंथांमध्ये महिलांवर बंधने घालणारी अशी अनेक पुस्तके किंवा नियमही कार्यरत असतात. साहजिकच महिलांनी केवळ मनुस्मृतीच्या मानसिकतेतून बाहेर यावे असे नाही तर, महिलांवर बंधने घालण्याच्या एकूण तालिबानी पुरुषी मानसिकतेतूनच बाहेर यावे असेच राहुल गांधी यांना सुचवायचे आहे.
एखाद्या राजकीय पक्षाने किंवा त्याच्या प्रमुख नेत्याने आपले राजकारण बाजूला ठेवून एखाद्या महत्त्वाच्या विषयाला किती प्राधान्य द्यावे, याचे आदर्श उदाहरण म्हणूनच या संवाद प्रक्रियेकडे पहावे लागेल. अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांनी या सर्व संवादाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला असला तरी त्यातून योग्य बोध घेण्याचे काम सत्ताधारी पक्षाला करावेच लागणार आहे. देशातील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. कामाच्या ठिकाणी होणार्या महिलांचा लैंगिक छळही कायम आहे.
महिलांना नेहमीच भेदभावाची वागणूक दिली जात आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सादर केलेल्या आकडेवारीप्रमाणे देशातील 80% महिलांना कधी ना कधी छळवणुकीला सामोरे जावे लागत आहे.तालिबानी प्रवृत्तीच्या आणि पुरुषी मानसिकतेच्या दडपणामुळे या छळाची तीव्रता वाढत आहे हे उघड आहे.
साहजिकच जंतर-मंतरवरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्रातील सत्ताधारी पक्षाने जेन झी म्हणजे तरुण पिढीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असेल तर, आता राहुल गांधी यांच्या पुण्यातील संवादानंतर सत्ताधारी पक्षाने विशेषतः केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बहिणींची ही गुंज गांभीर्याने घ्यायला हवी.
भारतीय लोकसंख्येचा अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा असलेल्या महिला अद्यापही समस्या मुक्त नाहीत याची जाणीव राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करून देण्यात आली आहे. साहजिकच आता राहुल गांधी यांनी अधोरेखित केलेल्या महिलांच्या समस्या सोडवण्याकडे केंद्र सरकारने प्राधान्याने लक्ष द्यायला हवे.






