Hingoli : हिंगोली जिल्ह्यातील बासंबा शिवारात महावितरणच्या वीज तारांना स्पार्किंग होऊन गव्हाचे व उसाचे पीक जळून खाक झाले. ९ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत एकूण पाच शेतकऱ्यांचे मिळून २ लाख ८९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कसे लागली आग? बासंबा शिवारातील गट क्रमांक १६७ मध्ये वीज वितरण कंपनीच्या तारांना अचानक स्पार्किंग झाली आणि शेतातील पिकांना आग लागली. हातातोंडाशी आलेले पीक क्षणार्धात राखेत रूपांतरित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले. कोणाचे किती नुकसान? आनंदराव सखाराम ढाले यांच्या एक हेक्टर १४ आर क्षेत्रावरील ऊस पूर्णतः जळून गेला, तसेच त्यांचे पाच स्प्रिंकलर पाईपही जळाले. कैलास सखाराम ढाले यांच्या ६३ आर क्षेत्रातील गहू व १५ स्प्रिंकलर पाईप जळाले. शामराव सखाराम ढाले यांच्या ६३ आर क्षेत्रातील गहू, तसेच सुमनबाई अंकुश ढाले यांच्या ६३ आर क्षेत्रावरील गव्हाचे पीक व पाच स्प्रिंकलर पाईप पूर्णपणे जळून खाक झाले. या चारही शेतकऱ्यांचे मिळून २ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच गट क्रमांक १६६ मधील अमृतराव पुंजाराव ढाले यांच्या शेतातील १० स्प्रिंकलर पाईप जळून त्यांचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामा पूर्ण; नुकसानभरपाईची मागणी – घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी ए. एच. सय्यद यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा केला. शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.