हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील गायरान जमिनींवर खासगी कंपन्यांचे सौर प्रकल्प उभे करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आता संतापाची लाट उसळली आहे. “गायरान जमिनीवर सौर प्रकल्प उभारताना खासगी कंपन्यांना ग्रामपंचायतीच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची (NOC) गरज नाही,” असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रातून समोर आले आहे. या निर्णयामुळे संतापलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव येथे सुमारे ३०० एकर गायरान जमीन आहे. ही जमीन अतिक्रमणमुक्त करण्यासाठी गावकरी गेल्या ३-४ वर्षांपासून लढा देत होते. गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर काही प्रमाणात यश आले, मात्र आता प्रशासनाने हीच जमीन सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा घाट घातला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ग्रामपंचायतीला डावलून थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा आधार घेत या जमिनी ताब्यात घेतल्या जात असल्याने, हा राज्य सरकारचा ‘डाव’ असल्याचा दावा शेतकरी संघटनेने केला आहे. पानकन्हेरगाव फाट्यावर रास्ता रोको या निर्णयाच्या निषेधार्थ ३१ डिसेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सेनगाव-रिसोड महामार्गावरील पानकन्हेरगाव फाट्यावर शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यावेळी आंदोलक कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर गावातील गायरान जमीन संपुष्टात आली, तर भविष्यात गुराढोरांना कुठे चरायचे आणि वैरण कुठून आणायची, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. प्रशासनाने ही जमीन उद्योजकांना देऊन शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे आंदोलनाची तीव्रता पाहून नायब तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले. या तक्रारीवर आणि आंदोलनात गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रवीण मते, संजय रोडकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा सहभाग होता. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे.