प्रभात वृत्तसेवा सातारा – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली. अखेर निवडणूक जाहीर झाली. अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा करणाऱ्या ग्रामीण भागातील नेते व कार्यकर्त्यांमध्ये आता एक चैतन्य निर्माण होणार आहे. साडेचार वर्षांपासून रेंगाळलेल्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्यासाठी इच्छुक आहेत. राज्याच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आलेले पक्ष या निवडणुकांत प्रत्येक ठिकाणी स्वतःची ताकद आजमवाणार आहेत, हे जवळजवळ निश्चित आहे. सातारा जिल्ह्यातही पूर्ण वर्चस्व मिळवू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा वारु रोखण्यासाठी महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबरच महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) असे सारेच पक्ष टोकाची भूमिका घेऊन मैदानात उतरणार आहेत. मात्र, प्रत्येक जण स्वबळावर असल्यामुळे या बहुरंगी लढतींमध्ये सत्तेचा मुकुट कोणाला मिळणार हे शेवटी मतविभागणी कशी होते, त्यावरच अवलंबून आहे… काँग्रेस अनेक वर्षे आणि गेली २५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेली जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी प्रत्येक पक्ष इच्छुक आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक उत्सुकतेचा विषय उरला नाही. प्रतीक्षा करुनच नेते कार्यकर्ते घाईला आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत या प्रक्रियेबाबत आदेश दिल्यामुळे या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत संपून सुमारे साडेचार वर्षे झाली. प्रशासकीय राजवटीत केवळ अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार विकासाचे नेमके चित्र फुलत राहिले. लोकप्रतिनिधींशिवाय चाललेल्या कारभाराने काय दिले यापेक्षाही आता येणारे लोकप्रतिनिधी सर्वसामान्य माणसांना दिलासा कसा देतील,ते महत्त्वाचे ठरणार आहे. दीर्घकाळानंतर होणारी निवडणूक लढविणे आणि जिंकणे अनेकांचे स्वप्न आहे. आता हे स्वप्न पूर्ण करण्याचे दिवस आले आहेत. अनेकांनी केलेली तयारी प्रतीक्षेतच वाया गेली. हल्लीची निवडणूक कार्यकर्त्यांच्या बळापेक्षाही अर्थकारणाभोवती रेंगळणारी आहे. त्यामुळे अनेक इच्छुक कधी एकदा निवडणूक होते, अशा विवंचनेत होते. निवडणुका लांबल्याने इच्छुकांची संख्या मोठी होती. आता पक्षही बहुत झाले आहेत. त्यामुळे सर्वच गट आणि गणांत प्रत्येक पक्षाला उमेदवार मिळू शकतो, अशी परिस्थिती आहे.भारतीय जनता पक्षाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वच संस्थांमध्ये वर्चस्व मिळविण्याचे ठरविले आहेच. त्यामुळे त्या पक्षाकडून लढू इच्छिणाऱ्यांनी कधीच शड्डू ठोकला आहे. पक्षही तयारीतच आहे. विधानसभा निवडणुकीतील ‘न भूतो’ मिळवलल्या यशाने पक्ष आणखीन खुलला आहे. भाजपचा अंदाज लक्षात आल्याने अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे याची शिवसेना हे महायुतीमधील दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांनी पक्ष मजबुतीसाठी सुरु केलेल्या प्रयत्नांची अंतिम दिशा ‘जिल्हा परिषद’च आहे. त्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करतील, असाही एक कयास आहे. हे दोन्ही पक्ष एकत्रित येतील किंवा दोन्ही पक्ष स्वतंत्रपणेही रिंगणात असू शकतील. एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही त्याच पद्धतीने आपले वर्चस्व वाढविण्यासाठी सज्ज झाली आहे.