प्रभात वृत्तसेवा सातारा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या सहकार्याने लढवल्या जाणार आहेत. समन्वय, संयम आणि अचूक रणनीती हे शिवेंद्रसिंहराजे यांच्या रणनीतीचा भाग असून जिल्ह्यातील दहांपैकी सात नगरपालिका निवडून आणणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून पक्षश्रेष्ठींना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांमध्ये याच यशाची अपेक्षा आहे. जिल्ह्यामध्ये भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. वर्चस्व राखण्याच्या दृष्टीने भाजपची रणनीती नेहमीच आक्रमक राहिली आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजप हाच पक्ष वरचढ राहिला आहे. यशाची ही चढती कमान राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कायम राहावी हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षा आहे. त्यादृष्टीने पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिवेंद्रसिंहराजे यांना योग्य त्या रणनीतीच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. कराड उत्तर, कराड दक्षिण, माण आणि सातारा या चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे तेथील गटाच्या आणि गणाच्या उमेदवार निवडीवर स्थानिक आमदारांचे वर्चस्व राहणार आहे. कराड तालुक्यामध्ये सर्वाधिक 12 तर सातारा तालुक्यामध्ये आठ आणि पाटण मतदारसंघांमध्ये सात असे जिल्हा परिषदेचे सर्वाधिक गट आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंह राजे यांना आपल्या सहकारी आमदारांना घेऊन तेथे समन्वयक राजकारण राबवावे लागणार आहे. दुसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊन भाजपच्या विरोधात उमेदवार देता येईल का, यादृष्टीने चाचपणी करताना महायुतीच्या बैठकीचा डाव टाकला आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी पालकमंत्री जिल्ह्याचे मुख्य आहेत त्यांनीच बैठक बोलवावी, अशी सकारात्मक अपेक्षा व्यक्त करत समन्वयाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. मात्र, महायुतीमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून बेरजेचे राजकारण करण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूने प्रयत्न होणे आवश्यक आहे. कराड व पाटण या दोन तालुक्यांमध्ये शिंदे गटाचा आत्मविश्वास सातवे आसमान पर आहे. त्यामुळे तेथे रणनीती राबवताना शिवेंद्रसिंहराजे यांना आमदार मनोज घोरपडे आमदार डॉ. अतुल भोसले यांना चाणाक्षपणे रणनीती राबवत जनमताचा कौल आजमावा लागेल. बऱ्याच गटांमध्ये राजकीय इच्छुक मोठ्या प्रमाणावर आहेत. बऱ्याच गटांमधून आतापासूनच अपक्ष आणि बंडखोरीचे इशारे दिले जाऊ लागले आहेत. अगदी शिवेंद्रसिंहराजे यांच्या तालुक्यातील होम पिचवरील शेंद्रे गटांमध्ये सुद्धा राजकीय उलथापालथी मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांच्या राजकीय धुरंधर क्षमतेची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे.