उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी; ३२ उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी आजमावले नशीब. ZP Election 2026 – माण तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली. अर्जाच्या शेवटच्या दिवसाअखेर काल निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी ४० अर्ज, तर पंचायत समितीच्या १० गणांसाठी ८७ अर्ज दाखल झाले आहेत. माण तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटांत ३२ उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. कुकुडवाड गटात सर्वाधिक १८अर्जांसह १२ उमेदवार रिंगणात आहेत. आंधळी गटात ८ अर्जांसह ६ उमेदवार, बिदाल गटात ५ अर्जांसह ५ उमेदवार, गोंदवले बुद्रुक गटात ५ अर्जांसह ५ उमेदवार तर मार्डी गटात ४ उमेदवारंनी ४ अर्ज दाखल केले आहेत. पंचायत समितीच्या १० गणांसाठी एकूण ७५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काही गणांमध्ये उमेदवारांची संख्या पाहता अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.वावरहिरे गणात १३ उमेदवारांनी १५ अर्ज दाखल केले आहेत. मलवडी गणात ९ उमेदवाराचे ११ अर्ज, वरकुटे मलवडी गणात ८ उमेदवारांचे १० अर्ज, आंधळी गणात ५ उमेदवारांचे ९ अर्ज, गोंदवले बुद्रुक गणात ८ उमेदवारांचे ८ अर्ज, बिदाल गणातून ७ उमेदवारांचे ७ अर्ज, पळशी गणात ७ उमेदवारांचे – ७ अर्ज, कुकुडवाड गणात ७ उमेदवारांचे ७ अर्ज, मार्डी गणात ६ उमेदवारांचे ६ अर्ज आणि वरकुटे म्हसवड गणातून – ५ उमेदवारांनी ५ अर्ज दाखल केले आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे आणि तहसीलदार विकास अहिर यांच्या उपस्थितीत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडली. अर्जे मागे घेण्याची मुदत दि. २७ जानेवारी आहे. त्याच दिवशी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार असून उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. त्यामुळे दि. २७ जानेवारीनंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला रंग येणार आहे. तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.