प्रभात वृत्तसेवा औंध – औंध, ता. खटाव येथील श्री यमाई देवी यात्रेनिमित्त आज शुक्रवार दि. 16 रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. यावेळी प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यांत लढत होणार आहे.श्री यमाई देवस्थान च्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री यमाई देवी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ औंध यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. मूळपीठ देवीच्या पायथ्याशी असलेल्या भव्य आखाड्यात दुपारपासून लढतीचा हा थरार रंगणार आहे. सुबोध पाटील, शिवराम दादा तालीम पुणे विरुद्ध वैभव माने आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे यांच्यात सामना रंगणार आहे. राघू ठोंबरे कोल्हापूर विरुद्ध श्रीमंत भोसले इचलकरंजी, धिरज पवार कुंडल विरुद्ध सागर तामखडे बेलापूर परस्परांशी भिडणार आहेत. मैदानात लहान गटातील चटकदार कुस्त्या देखील होणार आहेत. लहान गटातील कुस्त्या शुक्रवारी सकाळी राजवाड्याशेजारील श्री यमाई देवी मंदिरात दुपारी बारा वाजेपर्यंत जोडल्या जाणार आहेत. इच्छुक मल्लांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुस्ती कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.