प्रभात वृत्तसेवा भुईंज ( सचिन इथापे ) – वाई नगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येवू लागली तसतशी रंग भरू लागली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमधून शिंदे शिवसेनेने माघार घेत पक्षातील गद्दारांना बाजूला करून ठराविक मुद्द्यावर कार्यकर्त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशीच लढत होणार, हे लपून राहिलेले नसले तरी टेंडरसाठी वाई शहराची ज्यांनी वाताहात केली, नेत्यांनी त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. सोशिक करदात्या वाईकरांनी हे ओळखले असून येत्या निवडणुकीत वाईकर जनताच अशांचा लेखाजोखा मांडणार असल्याचे बोलले जात आहे.मागील काही वर्षात कृष्णा नदीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे नगरपालिकेचे कारभारी निवडताना यंदा तीच-तीच चूक पुन्हा केली तर निव्वळ टेंडरपोटी वाई शहरातील गटार गंगा, कचरा डेपो, बोगस बिल, कंत्राटी ठेकेदारांचे चराऊ रान पुन्हा पाच वर्ष आहे तसेच राहून वाईकरांची कृष्णा मैलीच रहाणार आहे, हे सांगायला कुठल्याही ज्योतीषाची गरज नाही. सध्या वाई शहराची समस्या व विकास बघता वाई नगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत स्वछ अभ्यासू चेहर्याची वलग्ना करून नेत्यांकडून वाईकरांची फसवणूक केली जात असल्याचे करदात्या वाईकरांच्या एव्हाना लक्षात आले आहे. मतदानातून त्याची फक्त अंमलबजावणी करणे गरजेचे व निकडीचे आहे. नाहीतर पाहुण्या-रावळ्यांची टोळी मनाला वाटेल तसे बनावट विकासाचे ठराव टेंडरच्या माध्यमातून वाईकरांच्या कराची होळी करण्यास टपलेली आहेच. मागील दहा वर्षात वाईकर जनतेच्या नव्हे तर शहराच्या मूलभूत समस्यांची वाताहात करून टाकली आहे. शहराचा विकास तोंडी लावण्यापुरते वापर करणारे तर काहीजण वाईकरांकडे ढुंकूनही न पहाणारे आहेत. फक्त नेत्यांच्या मागेपुढे करणारे निवडणूक आली की जाहिराती व सोशल मीडियातुन वाई शहराच्या विकासाचे पोवाडे गात आहेत. निष्कलंक, स्वछ, नि:स्वार्थी, अभ्यासू अध्यक्ष पाहिजे म्हणून ओरडा करणारे प्रत्यक्षात मात्र चुकीच्या कामाला टेंडरला थारा न देणार्या माणसाला तिकीट मिळू नये म्हणून नेत्यांची लाभार्थी मलिदा गँग एकत्र येवून भविष्यातील त्यांच्या फायद्यासाठी नेत्यांच्या पुढे उठाबशा काढणारी महाभारत फेम कौरव गँग बाहेरील उमेदवार समस्त वाईकरांच्या बोकांडी बसवत असतील तर मात्र प्रत्यक्षात यातील खरे अभ्यासक, स्वछ चेहरे कोणते हे वाईकरांनी ओळखले पाहिजे. नेत्यांवरील निष्ठा हि विष्ठेसारखी आजकाल बाजूला फेकून दिली जात असल्याने काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण उभारले आहे. तर यापूर्वी नेत्यांवर कधीही निष्ठा नसणार्यांना मात्र वाई शहराच्या खुर्चीवर बसवण्याचा घाट घातला गेल्याने करदात्या वाईकरामधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. समस्त वाईकरांचे मत जाणून न घेता भविष्याच्या राजकीय फायद्यासाठी नेत्यांनी ठराविक आयात टोळीच्या हट्टापायी वाई शहरातील जनतेवर अन्याय केल्याने दाबलेले व दबलेले शहरातील निष्ठावंत प्रथमच बाहेर पडल्याने कधी नव्हे ती वाई नगरपरिषद निवडणूक चूरशीची होणार आहे.