प्रभात वृत्तसेवा वाई – गुरुवर्य श्री संभाजीराव विनायकराव भिडे (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने यावर्षीची ४० वी ऐतिहासिक गडकोट मोहीम आयोजित करण्यात आली असून ही मोहीम दि. २३ जानेवारी २०२६ ते २६ जानेवारी रोजी या कालावधीत होणार आहे. ही गडकोट मोहीम श्री लोहगड ते श्री भिवगड अशी असून, या दरम्यान श्री एकविरा देवी मंदिर व श्री राजमाची गड यांचा समावेश असलेला ऐतिहासिक व सांस्कृतिक पदभ्रमण मार्ग निवडण्यात आला आहे. या मोहिमेत वाई शहरासह संपूर्ण वाई तालुक्यातून ५०० पेक्षा अधिक धारकरी सहभागी होणार असून, शिवभक्तांमध्ये या मोहिमेबाबत उत्साहाचे वातावरण आहे. शिवरायांचा इतिहास, स्वराज्याची मूल्ये, शिस्त, संघटन व राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने ही मोहीम दरवर्षी आयोजित केली जाते. या चार दिवसांच्या गडकोट मोहिमेदरम्यान धारकऱ्यांना ऐतिहासिक गडकोटांचे महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, तसेच भारतीय संस्कृतीचे मोल याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पदभ्रमणाबरोबरच प्रभातफेरी, शिवचरित्र कथा, बौद्धिक सत्रे, देशभक्तीपर कार्यक्रम, शिस्तबद्ध जीवनशैलीचे प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ही मोहीम पूर्णतः शिस्तबद्ध असून धारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनुभवी मार्गदर्शक, स्वयंसेवक, तसेच आवश्यक वैद्यकीय व व्यवस्थापकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या ऐतिहासिक गडकोट मोहिमेत जास्तीत जास्त शिवभक्त, युवक, तरुण व शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.