Wai Municipal Council – वाई नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांनी लोकशाही मूल्यांची पायमल्ली केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रजिस्टर्ड आघाडीने विषय समित्यांच्या निवडीमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेऊन सभात्याग केला. उपनगराध्यक्ष निवडणुकीत व्हीप झुगारून भाजपच्या पाठिंब्यावर उमेदवारी दाखल करण्याचा प्रकार हा लोकशाहीचा अवमान असून, अशा राजकारणाचा वाईकर जनतेच्यावतीने निषेध नोंदवित असल्याचे राष्ट्रवादी आघाडीने स्पष्ट केले आहे.सन २०२५ मध्ये झालेल्या वाई नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘घड्याळ’ या अधिकृत चिन्हावर निवडून आलेले बारा नगरसेवक अधिकृतपणे रजिस्टर्ड आघाडी म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. या आघाडीचे पक्षप्रमुख म्हणून मंत्री मकरंद पाटील यांची नोंद आहे. दि. ९ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी पक्षप्रमुखांनी सर्व १२ नगरसेवकांना अधिकृत व्हीप जारी केला होता. मात्र, राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक घनश्याम उर्फ पिंटू चक्के यांनी या व्हीपच्या थेट विरोधात जात भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली असून, हा प्रकार म्हणजे सत्तेसाठी तत्वांना तिलांजली देण्याचे जिवंत उदाहरण असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे.ही कृती केवळ पक्षशिस्तभंगाची नाही, तर लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या वाईकर नागरिकांच्या जनमताचा अपमान करणारी आहे. सत्ताधाऱ्यांनी आपल्या संख्याबळाच्या जोरावर लोकशाही पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला आहे. या लोकशाहीविरोधी भूमिकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस रजिस्टर्ड आघाडीचे सर्व नगरसेवक दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या सर्व विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे. लोकशाही मूल्ये, पक्षशिस्त आणि जनतेचा कौल यांचा सन्मान राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शेवटपर्यंत लढा देईल, असा निर्धार गटनेते संग्राम पवार आणि पक्षप्रतोद शैलेंद्र देवकुळे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी नगरसेवक डॉ. सौ. जीविता जमदाडे, संदीप जावळे, सौ. शारदा काळे, भारत खामकर, डॉ. सौ. पद्मश्री चोरगे, अजित शिंदे, सौ. रेखा जाधव, सौ. नीलिमा खरात, गुरुप्रसाद चव्हाण उपस्थित हाेते.