प्रभात वृत्तसेवा सातारा – भाजप सातारा जिल्ह्याच्यावतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 17) आणि रविवारी (दि. 18) या मुलाखतींचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती भाजप कार्यालयातून देण्यात आली. भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांना जवाबदारी विभागून देण्यात आल्या आहेत. भाजपच्यावतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी स्थापन करण्यात आलेल्या पॅनलमध्ये जिल्हा निवडणूक प्रमुख मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, महायुती समन्वयक सुनील काटकर, मदनदादा भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, समशेरसिंह नाईक निंबाळकर, अनिल सावंत, तेजस सोनावले यांचा समावेश आहे. शनिवार, दि. 17 रोजी सकाळी 9 वाजता कोरेगाव तालुका, सकाळी 11 वाजता महाबळेश्वर व खंडाळा तालुका, दुपारी 12 वाजता वाई तालुका, दुपारी 1 वाजता फलटण तालुका, दुपारी 3 वाजता माण तालुका आणि दुपारी 4 वाजता खटाव तालुक्याच्या मुलाखती होणार आहेत. र विवारी दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता सातारा तालुका, दुपारी 12 वाजता जावळी तालुका, दुपारी 1 वाजता पाटण तालुका आणि दुपारी 3 वाजता कराड तालुक्याच्या मुलाखती पार पडणार आहेत. हा मुलाखत कार्यक्रम साताऱ्यातील हॉटेल लेक व्ह्यू येथे होणार असून सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या तालुक्याच्या ठरवलेल्या वेळेनुसार उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी येताना उमेदवारी अर्ज विहित नमुन्यात भरून सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच राखीव जागेसाठी इच्छुक उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक असल्याचेही पक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.