Satara ZP Election – ता. खटाव येथील मायणी जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात मातब्बर उतरले असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपताच मायणी गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शरद पवार गट पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करून निवडणूक रिंगणात उतरवत थेट ताकद लावली आहे. त्यामुळे या गटात अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.या जिल्हा परिषद गटातून सुरेंद्र गुदगे व त्यांच्या सुविद्य पत्नी शोभना गुदगे यांनी गेले तीन टर्म राष्ट्रवादी मधून निवडणून येऊन गड राखला होता. मात्र गणातून त्यांच्या सोबत उमेदवारी घेणारे सातत्याने पराभूत होत होते. गत निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून येऊन सौ. मेघा पुकळे यांनी या मतदार संघात कमळ फुलवले होते. ग्रामविकास मंत्री आ.जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रात भाजपला अच्छे दिन आलेले पहायला मिळत आहेत.प्रत्येक विधानसभा निवडणुकीत गोरे यांना सातत्याने विरोध करणाऱ्या गुदगे यांना या निवडणुकीत धूळ चारण्याचा चंग गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. परंतु, गोरे यांच्या गटातून कोण उमेदवारी करणार याबाबत संभ्रम असल्याने या दिरंगाईचा फायदा घेत गुदगे यांनी मतदार संघात सर्वत्र फिरून टाईट यंत्रणा लावली असल्याची चर्चा सुरू आहे. Satara ZP Election आरक्षण कोणतेही असू आपणच व गत तीन निवडणुकीचा अनुभव असल्याने त्यांनी देखील चांगलीच तयारी केली आहे.माण खटाव तालुक्यातील दुष्काळ मिटवण्यासाठी गोरे यांच्या सोबत सक्रीय झाले माजी आमदार डॉ. येळगावकर यांच्या पुढाकाराने मायणी जिल्हा परिषद गटातून ॲड. सुरज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मायणीचे माजी उपसरपंच राहिलेले सुरज पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने प्रस्थापित गुदगे यांच्या समोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी (अ.प.) गटातून माजी सभापती व माजी सरपंच चंद्रकात पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांनी देखील जनसंपर्काच्या मैदानात चांगलीच सरशी घेतली आहे. माजी सभापती व सरपंच पदाचा अनुभव असल्याने त्यांचा देखील मतदार संघात चांगलाच दबदबा आहे. त्यांच्या विरोधात त्यांचे सहकारी प्रसाद (राजू) बलभीम जुगदर यांनी देखील नुकताच भाजपमध्ये जंगी प्रवेश करून उमेदवारीचा अर्ज भरला आहे. वारकरी संप्रदाय आणि गलाई व्यावसायिक व बैलगाडा शर्यती क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या जुगदर यांचा देखील जनसंपर्क दांडगा असल्याने कलेढोणमधील एकाच पॅनलमधून सक्रिय असणाऱ्या पवारांच्या विरोधात जुगदर असे उमेदवारीचे चित्र निर्माण झाले आहे.यासोबत शेखर गोरे यांचे विश्वासू पांडुरंग झगडे तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटातून ॲड. पी डी सावंत यांनी जिल्हा परिषद गटातून अर्ज भरला असून आमदार जयुकमार गोरे यांचे खंदे समर्थक सचिन यांनी अपक्ष अर्ज भरल्याने बंडखोरीचे आव्हान निर्माण झाले आहे.