Satara ZP Election – सर्व सोयीसुविधांनी युक्त शहर, वाढते औद्योगिकीकरण, विकासात्मक धोरण, प्रगतिशील शहर ही शिरवळची ओळख महाराष्ट्राच्या नकाशावर झाली आहे. मंत्री मकरंद पाटील यांच्यामार्फत आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले यांच्या माध्यमातून शिरवळचा चेहरामोहरा बदलला आहे. शिरवळ गटात असे एक गाव नाही, जिथे कबुले यांनी विकासकाम केलेले नाही. या सर्व कामांची साक्ष गटातील प्रत्येक गावातील नागरिक देत आहेत. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शिरवळ गटातील मतदार उदय कबुले यांच्या पाठीशी उभे राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील, असा विश्वास खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र तांबे यांनी व्यक्त केला. शिरवळ गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदय कबुले, गणाच्या उमेदवार छाया जाधव आणि पळशी गणाच्या उमेदवार शारदा जाधव यांच्या प्रचारार्थ गावभेट दौर्यात तांबे बोलत होते. ते म्हणाले, आज जे विरोधात आहेत, त्यांना पक्षाने काय दिले नाही? सर्व करूनही आज ते आबांच्याही विरोधात बोलत आहेत. जनतेने कोणत्याही खोट्या आश्वासनांना व भूलथापांना बळी न पडता विकासाला मत द्यावे. उदय कबुले यांना मत म्हणजेच विकासाला मत आहे. कारण, रस्ते, गटारे, कचरा नियोजन, स्ट्रीटलाईट, सीसीटीव्ही, चांगल्या शैक्षणिक सुविधा अशा अनेक बाबतीत शिरवळ सदैव अग्रेसर आहे. गटातील प्रत्येक गाव हे शिरवळ शहरासारखे बनवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शिरवळमध्ये मोठा वैद्यकीय प्रकल्प उभा राहतोय. तेथे तरुणांना कामाला लावण्याचे आश्वासन विरोधक देत आहेत; परंतु हा प्रकल्प संपूर्ण जिल्हा सोडून शिरवळमध्येच का येतोय? कारण शिरवळ हे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट आणि प्रगतिशील शहर झाले आहे. अजितदादांच्या माध्यमातून मंत्री मकरंद पाटील यांनी शिरवळ गटातील प्रत्येक गावात विकासकामे करून, विशेष प्रेम केले आहे. सत्तेच्या लालसेपोटी राजकारण गढूळ करण्याचा कोणीही कितीही प्रयत्न केला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घड्याळाचा गजर करण्याचा निर्धार केला आहे. हीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावनिक साद उदय कबुले यांनी मतदारांना घातली. गटातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासाची केवळ घोषणा न करता, रस्ते, पाणी, महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती, शेतीपूरक व्यवसाय, वैद्यकीय सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने कशा देता येईल, यावर भर असेल, अशी ग्वाही कबुले यांनी दिली. व्यापक नेतृत्वाला गटातील जनता साथ देईल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना उदय कबुले यांनी केवळ शिरवळ गटातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात विकासकामे केली. अशा व्यापक नेतृत्वाला, त्यांच्या विकासकामांच्या दातृत्वाला शिरवळ गटातील जनता पूर्णपणे साथ देईल. शिरवळ गट, गण आणि पळशी गणात राष्ट्रवादीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील, असा विश्वास शिरवळचे लोकनियुक्त सरपंच रविराज दुधगावकर यांनी व्यक्त केला.