प्रभात वृत्तसेवा सातारा – औंध पोलीस ठाण्याच्या आवारात बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी वाहनांच्या मालकांनी आपल्या मालकी हक्काचे पुरावे सादर सादर करून, आपली वाहने घेऊन जावीत, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.औंध पोलीस ठाण्याच्या आवारात 51 मोटारसायकली पडून आहेत. त्या ताब्यात मिळण्यासाठी संबंधितांनी पोलीस ठाण्याशी अद्याप संपर्क साधलेला नाही. या वाहनांसंदर्भात संबंधित कार्यालये, मोटारवाहन कंपन्या, इन्शुरन्स कंपन्यांशी पत्रव्यवहार करून, आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. ही वाहने बरेच दिवस पडून असल्याने, ती गंजत आहेत. त्यामुळे या वाहनांचे मूल्यांकन दिवसेंदिवस कमी होत होत असल्याने, या वाहनांचा लिलाव करून, निर्गती आवश्यक आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस सुधारीत अधिनियमान्वये औंध पोलीस ठाण्याकडील बेवारस दुचाकी वाहनांचा जाहिरनामा दि. 24 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा जाहिरनामा प्रसिद्ध झाल्यापासून दोन महिन्यांत संबंधित मालकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या वाहनांचे मालकीहक्क, हितसंबंध, वारसहक्क, तारणहक्क, विमाहक्क याचे मूळ दस्तऐवज औंध पोलीस ठाण्यास सादर करावेत. आपल्या मालकीहक्काची कायदेशीर खात्री देऊन, वाहने घेऊन जावीत. या मुदतीनंतर संबंधित वाहनांवर हक्क सांगता येणार नाही. या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया करण्यात येईल, असे तुषार दोशी यांनी कळविले आहे.