प्रभात वृत्तसेवा सातारा – दुचाकी वाहनांना डॅझलिंग लाइट लावलेल्या आणि फटाक्यांसारखे आवाज काढणारे सायलेन्सर बसवलेल्या वाहनधारकांवर सातारा पोलिसांच्या वाहतूक शाखेने छ. शाहू चौकात शुक्रवारी कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर ट्रिपल सीट फिरणार्या वाहनधारकांनाही दंड करण्यात आला.शहरात अनेक दुचाकींवर बसवलेल्या डॅझलिंग लाइटमुळे ज्येष्ठ नागरिकांना रात्री त्रास होत असल्याच्या तक्रारी वाहतूक शाखेकडे आल्या होत्या. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांनी या तक्रारींची दखल घेऊन, वाहूतक पोलीस कर्मचार्यांसमवेत छ. शाहू चौकात वाहनधारकांवर कारवाई केली. दुचाकी वाहने थांबवून, डॅझलिंग लाइट लावल्या आहेत का, हे तपासण्यात आले. काही वाहनधारक ट्रिपल सीट जात होते, तर काहींनी फटाक्यांसारखे आवाज काढणारे सायलेन्सर बसवले होते. अशा एकूण 19 वाहनधारकांवर कारवाई करून, सात हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईने वाहनधारकांची तारांबळ उडाली होती.