प्रभात वृत्तसेवा सातारा – जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि मानवातील वाढता संघर्ष टाळण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी 25 पिंजरे उपलब्ध करून दिले आहेत. ग्रामीण भागात त्यांचा उपयोग केला जाणार आहे. तसेच शहरी भागांमध्ये बिबट्यांच्या सूचनेसाठी आवश्यक ठिकाणी एआय तंत्रज्ञानावर आधारित अलार्म बसवले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाच्या वतीने मोठी चर खणली जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन इत्यादी उपस्थित होते. पालकमंत्री शंभूराज म्हणाले, जिल्ह्याच्या पश्चिम भागामधील बिबट्यांचे मानवी वस्तीतील वाढते प्रमाण तसेच जनावरांवरील हल्ले टाळण्यासाठी योग्य ठिकाणी 25 पेक्षा अधिक पिंजरे लावण्यात आले आहेत.मत्त्यापूर येथील बिबट शिकार प्रकरणाबाबत ते म्हणाले, वनविभागाचे पथक याबाबत शिकार्यांचा शोध घेत असून अहवालप्राप्तीनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. याशिवाय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी बिबट्या येण्यापूर्वीच त्याच्या आगमनाची सूचना देणारे एआय तंत्रज्ञानावर आधारित अलार्म बसविण्यात येणार आहेत. पाटण, सातारा व जावली हे तीन तालुके सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच चांदोली अभयारण्य या दोन प्रकल्पांच्या अत्यंत दुर्गम क्षेत्रातील गावांमध्ये बिबट्यांचे हल्ले टाळण्यासाठी वनविभागाच्या वतीने मोठे चर खोदण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. हे चर वनविभागाच्या हद्दीलगत शेती क्षेत्रामध्ये घेतले जाणार आहेत. ठाकरे बंधूंचे वक्तव्य स्वतःची पोळी भाजण्यासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू लोकसभा निवडणुकांप्रमाणे आता खोट्या अफवा पसरवत आहेत. महाराष्ट्राचे कुठेही तुकडे केले जाणार नाहीत. खोट्या अफवा पसरवून मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने स्वतःची पोळी भाजून घेण्याचा हा ठाकरे बंधूंचा प्रयत्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणेच हा महाराष्ट्र चालतो. मुंबईतील मराठी माणसाला वेगवेगळी वक्तव्य करून भुलवले जात आहे, असा आरोप देसाई यांनी केला. जिल्ह्यामध्ये शिंदे गटाने चांगले यश मिळवले, याचे पालकमंत्री देसाई यांनी कौतुक केले. कराड येथे नगराध्यक्ष तसेच जिल्ह्यामध्ये 25 नगरसेवक निवडून आणल्याबद्दल त्यांनी शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद दिले. जिथे शिंदे गटाची ताकद कमी पडली त्या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.